Arijit Singh Starts New Chapter As Filmmaker : २७ जानेवारी रोजी बॉलीवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंहने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांसह असंख्य रसिक श्रोत्यांना धक्का बसला. कारण- या पोस्टमधून अरिजीतने पार्श्वगायनातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.

अरिजीतच्या पार्श्वगायनातील निवृत्ती घेण्याचा निर्णयामुळे त्याच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसला. त्याच्या हा निर्णय काही चाहत्यांना आवडला नाही. पण काहींनी त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले. अरिजीत आता चित्रपटांसाठी गाणी गाणार नसला, तरी तो त्याची स्वतंत्र गाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, अरिजीतबाबत आता एक नवीन बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पार्श्वगायन सोडल्यानंतर अरिजीत एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.

‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, अरिजीत सिंह आता दिग्दर्शक बनणार आहे. त्याने आपल्या पहिल्या चित्रपटाची संपूर्ण तयारी केली आहे. विशेष म्हणजे, अरिजीतने त्याच्या पहिल्या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी शोरा सिद्दीकीला संधी दिली आहे. पार्श्वगायनानंतर अरिजीत आता चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रात आपले नशीब आजमावणार आहे.

अरिजीत ज्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत आहे, त्याचे शूटिंग लंडनमध्ये सुरू झाले आहे. एकाच शहरात राहूनही तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे आयुष्य कसे असते, हे या चित्रपटातून पहायला मिळेल. सामाजिक विषमता आणि संघर्षावर आधारित या चित्रपटाची कथा असल्याचे म्हटलं जात आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शोरा सिद्दीकी व्यतिरिक्त या चित्रपटात इतर कोणते कलाकार असणार, याबाबतही गुप्तता पाळण्यात आली आहे.

अरिजीतचे हे चित्रपट दिग्दर्शनातील पाऊल त्याच्या करिअरसाठी एक नवीन वळण ठरणार आहे. आता तो हा चित्रपट स्वतःच्या बॅनरखाली प्रदर्शित करणार की एखाद्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसची मदत घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अरिजीतच्या या नव्या प्रयत्नासाठी त्याचे चाहतेही खूप उत्सुक आहेत.

आपल्या सुमधुर गायनासाठी ओळखला जाणारा अरिजीत हा सर्वांत लोकप्रिय गायक आहे. रिअॅलिटी शोमधून आपला सांगीतिक प्रवास सुरू करत तो आज बॉलीवूडच्या सध्याच्या टॉप गायकांपैकी एक गायक बनला. पण त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे त्याचे असंख्य चाहते नाराज झाले आहेत. निवृत्तीनंतर त्याचे नुकतेच ‘धुरंधर-२’मध्ये एक गाणे समोर आले. या गाण्याला रसिकांकडून पसंती मिळत आहे.