कलाकार आपलं अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत व्यवसाय देखील करताना दिसत आहेत. तसंच काहीजण सामाजिक कार्यातही सहभाग घेताना पाहायला मिळत आहेत. अभिनेता सलमान खान, सोनू सूदसारखे अनेक कलाकार आहेत, जे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. सातत्याने गरजूंना मदत करत आहेत. अशाच प्रकारे बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल देखील सामाजिक कार्य करताना दिसत आहे. तिनं हृदयाच्या आजारासंबंधित असलेल्या ३००० मुलांवर उपचार करून त्यांना नवजीवन दिलं आहे. यासंदर्भात तिनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

गायिका पलक मुच्छलनं या टप्प्यापर्यंत पोहोचल्यानिमित्ताने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रुग्णालयात उपचार करणाऱ्या मुलांबरोबरचा हा व्हिडीओ आहे. नुकतंच गायिकनं एका मुलाची शस्त्रक्रिया केली; ज्याचं नाव आलोक असं आहे. ११ जूनला इंदौरमध्ये राहणाऱ्या आलोकवर शस्त्रक्रिया झाली. व्हिडीओ शेअर करत पलकनं लिहिलं , “आणि ३००० मुलांचा जीव वाचला. आलोकसाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून तो आता पूर्णपणे बरा झाला आहे.”

हेही वाचा – Video: ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये शालिन भनोटला २०० हून अधिक विंचवांनी केला दंश! धक्कादायक व्हिडीओ आला समोर

‘इ-टाइम्स’च्या वृत्तानुसार, पलक ७ वर्षांची असल्यापासून मुलांवर उपचार करत आहे. या सामाजिक कार्यासाठी पलकचं नाव ‘गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवलं आहे. आतापर्यंत या प्रवासाविषयी बोलताना गायिका म्हणाली, “जेव्हा मी हे मिशन सुरू केलं होतं तेव्हा मी फक्त ७ वर्षांची होती. ही छोटीशी सुरुवात होती, जीनंतर हळूहळू मोठी होत गेली. आता हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं मिशन आहे.”

पुढे पलक म्हणाली, “माझ्याजवळ अजून ४१३ मुलं आहेत, जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत. मी जे काही कॉन्सर्ट करते त्यातून येणारे पैसे मी या मुलांच्या मदतीसाठी वापरते. ज्या मुलांचे आई-वडील खर्च पेलू शकत नाही अशांना मदत करते. ईश्वराने मला यासाठी निवडलं आहे, म्हणून मी खूप आनंदी आहे.”

हेही वाचा – Video: “खल्लास”, अल्लू अर्जुन व रश्मिकाच्या ‘अंगारों’ गाण्यावर गौतमी पाटीलचा जबरदस्त डान्स पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

“जेव्हा मी गायिका नव्हते तेव्हा मी तीन तास गाऊन पैसे जमा करायचे आणि मुलांची मदत करत होते. जसं जशी गाणी लोकप्रिय झाली मग तसं डोनेशन वाढू लागलं. त्यानंतर एका कॉन्सर्टमधून इतके पैसे मिळू लागले की, मी १३ ते १४ मुलांची शस्त्रक्रिया करू लागले. मी संगीताकडे नेहमीच समाजात बदल घडवून आणण्याचं माध्यम म्हणून पाहिलं आहे,” असं पलक मुच्छल म्हणाली.