Bollywood’s richest man is worth 36000 crore : हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत चित्रपटांचे बजेट आणि कलाकार-निर्मात्यांची कमाई यात प्रचंड वाढ झाली आहे. आज बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीची संपत्ती जगातील मोठ्या टेक कंपन्यांच्या सीईओंच्या संपत्तीला टक्कर देते. त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की, तीनही खान शाहरुख, सलमान आणि आमिर यांची एकत्रित संपत्तीही त्यापुढे कमी आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची माहिती देणारी ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६’ गेल्या आठवड्यात जाहीर झाली. नेहमीप्रमाणे अदानी आणि अंबानी पहिल्या दोन स्थानांवर आहेत. त्याचबरोबर या यादीत रिअल इस्टेट, फार्मास्युटिकल्स आणि ऊर्जा यांसारख्या पारंपरिक व्यवसायांतील उद्योजकांचाही समावेश आहे. बॉलीवूडमधील फक्त एकाच व्यक्तीला १०० मध्ये स्थान मिळालं आहे. ते आहेत भूषण कुमार. टी-सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांची संपत्ती तब्बल ३६,३०० कोटी रुपये आहे आणि ते या यादीत ८७ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती अतुल रुईया (३३,४०० कोटी), किरण मजुमदार शॉ (३२,९०० कोटी) आणि आदित्य खेमका (३२,२०० कोटी) यांच्यापेक्षाही जास्त आहे.
भूषण कुमार यांनी कलानिधी मारन यांना टाकलं मागे
भूषण कुमार यांनी ‘सन पिक्चर्स’च्या कलानिधी मारन यांना मागे टाकून भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्मात्याचा मान मिळवला आहे. कलानिधी मारन २४,६०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह १४६ व्या क्रमांकावर आहेत. तसेच भूषण यांनी बॉलीवूडमधील पूर्वीचे सर्वात श्रीमंत व्यक्ती रॉनी स्क्रूवाला (संपत्ती १६,००० कोटी रुपये) यांनाही मागे टाकलं आहे.
दोन वर्षांपूर्वी संपत्ती होती १०,५०० कोटी
२०२४ च्या ‘हुरुन रिच लिस्ट’नुसार भूषण कुमार आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती १०,५०० कोटी रुपये होती. म्हणजे अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या संपत्तीत तब्बल साडेतीन पट वाढ झाली आहे. याच काळात टी-सीरिजने म्युझिक लेबल आणि चित्रपट निर्मिती या दोन्ही क्षेत्रांत मोठी भरारी घेतली. सध्या भूषण यांची ३६,३०० कोटी रुपयांची संपत्ती दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉनी स्क्रूवाला यांच्यापेक्षा दुप्पट आहे. बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता शाहरुख खानची संपत्ती ९,५०० कोटी आहे. तर, शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांची एकत्रित संपत्ती १५,००० कोटी रुपये आहे. हा आकडा भूषण कुमार यांच्या संपत्तीच्या निम्म्याहूनही कमी आहे.
भूषण कुमार हे टी-सीरिज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. या कंपनीची स्थापना भूषण यांचे दिवंगत वडील गुलशन कुमार यांनी १९८३ मध्ये केली होती. १९९७ मध्ये गुलशन कुमार यांच्या निधनानंतर भूषण यांनी त्यांचे काका कृष्ण कुमार यांच्याबरोबर मिळून ही कंपनी सांभाळली. तेव्हा भूषण अवघ्या १९ वर्षांचे होते.
भूषण कुमार यांनी जबाबदारी सांभाळल्यावर त्यांनी टी-सीरिजचा विस्तार केला. त्यांनी चित्रपट वितरण आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. २०२० च्या सुरुवातीला टी-सीरिज कंपनी वर्षाला २० हून अधिक हिंदी चित्रपटांची निर्मिती करत होती. यामुळे ती देशातील सर्वात मोठी प्रॉडक्शन हाऊस बनली. त्यानंतरच्या वर्षांत त्यांनी निर्मिती कमी केली. २०२६ मध्ये, टी-सीरिज तीन थिएटर रिलीज चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकूण ७०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
