Sridevi Boney Kapoor Love Story : बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या लव्हस्टोरी गाजल्या असून, काहींची अजूनही रंगते. त्यापैकी अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची प्रेमकहाणी आजही सर्वाधिक चर्चेत असलेल्या नात्यांपैकी एक मानली जाते. एका विवाहित निर्मात्याच्या प्रेमात पडलेली सुपरस्टार श्रीदेवी आणि श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी बोनी यांनी पहिली पत्नी मोना शौरीला सोडल्याने त्या काळात मोठा वाद निर्माण झाला होता. बोनी कपूर व श्रीदेवीचे लग्न हे अनेक वर्षे चर्चेमध्ये होते. आता, बोनी कपूर यांनी श्रीदेवीवरील प्रेमाबद्दल आणि त्यांच्या नात्याविषयी मनमोकळेपणाने माहिती दिली असून, या नात्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
१९८३ साली बोनी कपूर यांनी मोना शौरी यांच्याशी लग्न केले होते. त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर अशी दोन मुलेही होती. मात्र, वैवाहिक आयुष्य सुरू असतानाच त्यांना अभिनेत्री श्रीदेवीबद्दल प्रेम आणि आकर्षण निर्माण झाले. श्रीदेवींशी लग्न करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न केले होते, याची कबुली बोनी कपूर यांनी अनेक मुलाखतींमध्ये दिली आहे. चंदा कोचर यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोनी यांनी श्रीदेवी त्यांच्या आयुष्यात कशा आल्या, त्यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली आणि प्रेम कसे फुलत गेले, याबाबत सांगितले. १९९३ मध्ये मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर बोनी आणि श्रीदेवी अधिक जवळ आल्याचे नमूद केले आहे.
सुरक्षेच्या कारणामुळे श्रीदेवीला आणले घरी
मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी श्रीदेवींकडे मुंबईमध्ये स्वतःचे घर नव्हते. त्यामुळे बोनी कपूर यांनी श्रीदेवीला घरी राहण्यासाठी आमंत्रण दिले होते. त्याबद्दल बोनी कपूर म्हणाले, “जेव्हा बॉम्बस्फोट झाला, तेव्हा सुरक्षेच्या कारणामुळे श्रीदेवीला घरी आणले होते. मी ताबडतोब तिच्या आईला फोन केला आणि श्रीदेवी आता हॉटेलमध्ये राहणार नाही, असे सांगितले आणि कर्मचारी पाठवून तिला घरी आणले. तेव्हा ती हॉटेल ‘सी रॉक’मध्ये राहत असे.
पुढे ते म्हणाले, “बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाल्याने श्रीदेवी माझ्या घरी पाहुणी म्हणून आली होती. तेव्हा तिने अर्जुनचे खूप लाड केले आणि त्याला खूप प्रेम दिले. पण तेव्हा अर्जुनला हे काय सुरू आहे कळायचं नाही. मला ते दिवस अजूनही चांगल्या प्रकारे लक्षात आहेत. पण, आयुष्यात आपण दर वेळी जे ठरवतो, त्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. त्यानंतर मे १९९३ मध्ये ‘रूप की रानी’ प्रदर्शित होईपर्यंत श्रीदेवी माझ्या घरीच राहिली.”
बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला स्पष्टपणे सांगितल्या होत्या भावना
बोनी कपूर यांना बायको व मुले, असे कुटुंब असतानाही ते श्रीदेवीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी त्यांच्या या भावनांबद्दल पहिली पत्नी मोना शौरी यांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यांच्या या निर्णयामुळे मोना यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, नंतर मोना यांनी वेगळे होत, अर्जुन व अंशुला यांचा सांभाळ केला. परंतु, नंतर मोना यांना कर्करोगाचे निदान झाले आणि आजाराशी लढा देत असताना २०१२ साली त्यांचे निधन झाले. तर श्रीदेवींचे २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईमधील जुमेराह एमिरेट्स टॉवर्स हॉटेलमध्ये निधन झाले.
