सलमान खानने आतापर्यंत अनेक कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. अनेक अभिनेत्रींना त्याने लाँच केलं आहे. तर अनेक कलाकारांच्या नावाची शिफारस केली आहे. यापैकीच एक म्हणजे कतरिना कैफ. सलमान खान व कतरिना यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या लोकप्रिय ‘वाँटेड’ चित्रपटातही कतरिनानेच काम करावं अशी त्याची इच्छा होती त्यामुळे त्याने तिच्या नावाची शिफारस केलेली असं बोनी कपूर यांनी सांगितलं आहे.

२००९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वाँटेड’चं दिग्दर्शन प्रभू देवाने केलं असून त्याने दिग्दर्शन केलेला हा पहिलाच चित्रपट होता. सलमान खानच्या करिअरमधील हा महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री आयशा टाकिया मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती. परंतु, या चित्रपटासाठी तिच्या आधी कतरिना कैफसह इतर अभिनेत्रींच्या नावाचाही विचार करण्यात आला होता असं बोनी कपूर यांनी सांगितलं आहे. त्यांनीच या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली होती.

तेलुगू चित्रपटाचा आहे रिमेक

सलमान खानचा ‘वाँटेड’ चित्रपट हा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवलं. मात्र, या चित्रपटाची नायिका वेगळी असती तर ‘वाँटेड’ काहीसा वेगळा दिसला असता. निर्माते बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, सलमान खानला सुरुवातीला कतरिना कैफने या चित्रपटात नायिका म्हणून काम करावं अशी इच्छा होती. सलमान खानचा ‘वाँटेड’ हा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू ब्लॉकबस्टर ‘पोकीरी’चा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत होता. बोनी कपूर यांनी ‘पोकीरी’ पाहिल्यानंतर राधे अर्थात राजवीर शेखावत ही भूमिका सलमान खानसाठी अगदी योग्य असल्याचं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला आणि राधेच्या भूमिकेसाठी सलमानची निवड केली.

‘पोकीरी’ पाहिल्यानंतर बोनी कपूर यांना राधे अर्थात राजवीर शेखावत ही भूमिका सलमान खानसाठी योग्य वाटली. त्यामुळे सलमानने मूळ चित्रपट पाहावा, यासाठी त्यांनी दोन प्रिव्ह्यू शोचं आयोजन केलं होतं. मात्र, व्यग्र वेळापत्रकामुळे सलमानला दोन्ही शोला उपस्थित राहता आलं नाही. या आठवणी सांगताना बोनी कपूर यांनी मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार सांगितलं होतं की, त्यांना भीती होती की ‘पोकीरी’चा तमिळ रिमेक प्रदर्शित झाला आणि तोही मूळ चित्रपटाप्रमाणे मोठा हिट ठरला, तर एखादा बॉलीवूड अभिनेता किंवा निर्माता या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे हक्के घेईल. त्यामुळे ‘गजनी’च्या वेळी जसं झालं, तसंच ‘पोकीरी’च्या बाबतीतही आपल्याला रिमेकचे हक्क गमवावे लागतील, अशी चिंता त्यांना होती. पण सलमानने नंतर तो चित्रपट पाहिला आणि होकारही दिला.

कतरिनाबरोबर जिनिलीयाच्या नावाचाही झालेला विचार

‘वाँटेड’मध्ये सलमान खानबरोबर एका नव्या अभिनेत्रीची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळावी, अशी बोनी कपूर यांची इच्छा होती. मात्र, सलमानने या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी कतरिना कैफच्या नावाची शिफारस केली होती, बोनी कपूर यांनी सांगितलं की, “पोकीरीचा हिंदी रिमेक असलेल्या ‘वाँटेड’मध्ये नायिकेच्या भूमिकेसाठी सलमानने कतरिना कैफचं नाव सुचवलं होतं. पण मला सलमानबरोबर यापूर्वी कधीही काम न केलेल्या अभिनेत्रीला या भूमिकेसाठी निवड करणं अधिक योग्य ठरेल, असं मला वाटलं. आम्ही जिनिलीया डिसूझासह अनेक अभिनेत्रींच्या नावांचा विचार केला आणि अखेर आयशा टाकियाची निवड केली”. अखेर आयशा टाकियाची जान्हवीच्या भूमिकेसाठी निवड झाली. चित्रपटात सलमान खानबरोबर तिची जोडी जमली आणि सलमान-आयशाची केमिस्ट्री ‘वाँटेड’ मधील लक्षात राहिलेल्या गोष्टींपैकी एक ठरली.