Border 2 Box Office Collection Day 1: मागील काही दिवसांपासून सगळीकडे ‘बॉर्डर २’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. १९९७ साली आलेल्या ‘बॉर्डर’चा सीक्वेल ‘बॉर्डर २’ अखेर २३ जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित झाला. अभिनेता सनी देओलचा बहुप्रतीक्षित ‘बॉर्डर २’ ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली आहे. या देशभक्तीपर चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले, त्याची आकडेवारी समोर आली आहे. हा चित्रपट जानेवारी २०२६ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमांपैकी सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपटाच्या क्लायमॅक्सला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरही बॉर्डर २ वर सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. चित्रपटातील सर्वच कलाकार मागील काही दिवसांपासून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. अखेर या सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाईची आकडेवारी समोर आली आहे. बॉर्डर २ ने पहिल्या दिवशी ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अनेक शहरांमध्ये बॉर्डर २ चे सकाळी ७:३० आणि ८ वाजता शो सुरू झाले. रिलीजच्या पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये मोठी गर्दी दिसून आली. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, बॉर्डर २ ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येही चांगली कामगिरी केली होती, ज्याचा थेट परिणाम त्याच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवर झाला.

बॉर्डर २ मधील कलाकार

बॉर्डर २ या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी, मेधा राणा, मोना सिंह, सोनम बाजवा, परमवीर चीमा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुराग सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि निधी दत्ता आणि भूषण कुमार यांनी त्याची निर्मिती केली आहे.

वीकेंडला कमाईत होणार वाढ

फिल्म इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते, बॉर्डर २ चित्रपटाला वीकेंड आणि प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा मोठा फायदा होईल, असं दिसतंय. परिणामी, येत्या काही दिवसांत बॉर्डर २ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये झपाट्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे. बॉर्डर २ चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार कमाई केली आहे, त्यामुळे हा चित्रपट पुढे कोणत्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.