Border 2 Box Office Collection day 17: सनी देओल काही दिवसांपासून त्याच्या ‘बॉर्डर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २३ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सुरुवातीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मात्र, सुरुवात चांगली झाली असली तरी नंतर या चित्रपटानं तुलनेने कमी कमाई केली.
सनी देओल, वरुण धवन, सुनील शेट्टी हे कलाकार ‘बॉर्डर २’मध्ये प्रमुख भूमिकांत दिसले आहेत. आजही हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून आहे. आता या चित्रपटाने १७ दिवसांत एकूण किती कमाई केली, हे जाणून घेऊ…
‘बॉर्डर २’ने १७ व्या दिवशी किती कोटींची केली कमाई?
१७ दिवसांत या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सॅल्कनिकनुसार या चित्रपटाने १७ व्या दिवशी ६.९० कोटींची कमाई केली. त्यासह चित्रपटाने ३०९.४ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ४४० कोटींची कमाई केली आहे.
‘बॉर्डर २’ आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ला मागे टाकू शकला नाही. ‘धुरंधर’ने पहिल्या १७ दिवसांत भारतात ५५५.७५ कोटींची कमाई केली होती. ‘बॉर्डर २’नंतर राणी मुखर्जीचा ‘मर्दानी ३’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. परंतु, या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती लाभली नाही. तसेच, शुक्रवारी, नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘वध २’ चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. ‘वध २’ने पहिल्या आठवड्याच्या शेवटी २.५० कोटी रुपये कमावले.
सनी देओलच्या सलग दोन चित्रपटांना मोठे यश मिळाले आहे. त्याचा ‘गदर २’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. तसेच त्याची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘जात’नेही जगभरात ११८.३६ कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘बॉर्डर २’ हा चित्रपट अनुराग सिंग यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मेधा राणा व मोना सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
वरुण धवनसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरला आहे. त्याचे कारण म्हणजे कोविडनंतर त्याचे जे चित्रपट प्रदर्शित झाले, ते अपेक्षित यश मिळवू शकले नव्हते. ‘बॉर्डर २’ आता त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
दरम्यान, सनी देओल या चित्रपटानंतर इक्का या चित्रपटात दिसणार आहे. त्या चित्रपटात अक्षय खन्नादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा असणार आहे. सनी देओल आणि अक्षय खन्नाला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

