Ministry of Defence objected Border Scene : अनेक सिनेमांमधून भारतीय जवानांचे शौर्य आणि त्यांची यशोगाथा ही पडद्यावर मांडण्यात आली आहे. या सिनेमांनी भारतीयांच्या मनामध्ये सैन्याबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण केला. भारतीय सैन्यावर आधारित ‘उरी’, ‘सफेद सागर’ यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण, बॉलीवूडमध्ये असा एक सिनेमा निर्माण झाला, ज्या सिनेमातून फक्त सैनिकांचे शौर्य नाहीच, तर त्यांच्या भावना आणि ते करीत असलेले समर्पण यांची गोष्ट मांडण्यात आली होती आणि तो सिनेमा म्हणजे ‘बॉर्डर’.
१९९७ साली रिलीज झालेला जे. पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सीमेवर देशासाठी लढणाऱ्या जवानांचं शौर्य, त्यांच्या कुटुंबीयांचा विरह आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असे सैनिकांच्या आयु्ष्यातील विविध पैलू चित्रपटात मांडण्यात आले होते. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान झालेल्या ‘लोंगेवालाची लढाई’वर आधारित या सिनेमाने सैनिकांचे आयुष्य आणि त्यांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या होत्या. त्यातील गाणी आणि चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. पण, त्यातील एका दृश्यावर भारतीय संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे ‘बॉर्डर’ सिनेमातील एक दृश्य कट करण्यात आले होते.
भारतीय संरक्षण मंत्रालयाने घेतला आक्षेप
या सिनेमामध्ये मथुरा दास ही भूमिका साकारलेले अभिनेते सुदेश बेरी यांनी ‘बॉर्डर’ सिनेमाच्या आठवणी सांगितल्या आहेत. अकंपनी अक्की या चॅनेलला दिलेल्या पॉडकास्टमध्ये त्यांनी ‘बॉर्डर’मधील एक महत्त्वपूर्ण दृश्य काढून टाकल्याची माहिती दिली होती. सुदेश व अभिनेता सुनील शेट्टी यांच्यामध्ये अॅक्शन सीन शूट करण्यात आला होता. मात्र, भारतीय संरक्षण मंत्रालयाने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर तो सिनेमातून कट करण्यात आला होता.
त्याबद्दल सांगताना सुदेश बेरी म्हणाले, ” ‘बॉर्डर’चा सर्वांत मोठा आणि फारसा कुणाला माहिती नसलेला किस्सा म्हणजे माझी आणि सुनील शेट्टीची फाईट. आमच्यातील मोठा भांडणाचा सीन शूट करण्यात आला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारीही झाली होती; पण नंतर संरक्षण मंत्रालयाने त्यावर आक्षेप घेतला. त्यांनी आम्हाला सांगितलं, “दोन सैनिक कधीच एकमेकांशी भांडत नाहीत. मतभेद असले तरी सैनिक शारीरिक इजा होतील अशी भांडणं करीत नाहीत. जर त्यांनी तसं केलं, तर दोघांचंही कोर्ट-मार्शल होईल आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकलं जाईल. हाच नियम आहे.'”
सैन्याचे नियमांचा आदर राखत सीन हटवला
सुदेश बेरी म्हणाले, “हा प्रसंग पूर्णपणे शूट झाला होता. मात्र, संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनंतर सैन्याचे नियमांचा आदर राखत, ‘तो’ सीन चित्रपटातून हटवण्यात आला. सिनेमांमध्ये असे काही सीन दाखवले जातात, पण त्याबाबत काही नियम व कायदे लागू असतात. त्यामुळे सिनेमा शूट करीत असताना या नियमांचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची गरज असते”
याच मुलाखतीमध्ये सुदेश बेरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय धुऊन पाणी प्यायचे असल्याचे वक्तव्य केले होते. ते म्हणाले, “तिथे (जंतर-मंतर) जमलेले सर्व निरुपयोगी लोक आहेत. देशासाठी त्यांनी काहीही योगदान दिलेले नाही. जंतर-मंतरवर बसून आंदोलन केल्यानं काहीही होणार नाही. मला पंतप्रधान मोदींचे पाय धुऊन, ते पाणी प्राशन करायचे आहे. माझी जर त्यांच्याशी भेट घालून दिली गेली, तर मी हे करायला तयार आहे. मी त्यांना व्यक्तीशः ओळखत नाही. मी अजून त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही. जसे आपण देवाला कधी भेटलो नाही, तरीही त्याची पूजा करतो. त्याप्रमाणेच मी पंतप्रधान मोदींचा आदर करतो आणि यात मला काहीच वाईट वाटत नाही.”
