Mahabharat Actress known for playing Kunti Is Away From Limelight : पौराणिक कथांवर आधारित अनेक मालिका आणि चित्रपट बनले आहेत. ८० आणि ९० च्या दशकात एकीकडे चित्रपटांची क्रेझ होती, तर दुसरीकडे काही पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांनी टीव्हीवर जबरदस्त लोकप्रियता मिळवली होती. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे महाभारत.
ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. महाभारताची महान कथा अनेकांना याच मालिकेमुळे समजली. या मालिकेत अनेक अशी पात्रं होती, ज्यांच्या कथा खूप रंजक होत्या. त्यापैकी एक म्हणजे कुंतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाजनीन. त्या एकेकाळी खूप लोकप्रिय होत्या पण, कालंतराने त्या इंडस्ट्रीतून दूर गेल्या.
महाभारत ही बी. आर. चोप्रा यांची लोकप्रिय आणि गाजलेली मालिका आहे. त्या काळात ही मालिका अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनली होती.या मालिकेत कुंतीची भूमिका अभिनेत्री नाजनीन यांनी साकारली होती. नाजनीन या अभिनेत्री मुमताज बेगम यांच्या भाची आहेत. महाभारतमधील कुंतीच्या भूमिकेमुळे नाजनीन घराघरात पोहोचल्या आणि त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.
नाजनीन यांनी कुंतीच्या भूमिकेपूर्वी सिनेमात काम केलं होतं. इतकंच नाही, तर त्यांनी पडद्यावर अनेक धाडसी आणि वादग्रस्त दृश्ये दिली आहेत. नाजनीन यांनी हिंदी सिनेमात अनेक लक्षात राहतील अशा भूमिका केल्या, मात्र त्यांना हवी तशी ओळख मिळाली नाही. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९७२ मध्ये ‘सा रे गा मा पा’ या चित्रपटातून केली. या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडली. यानंतर त्या अनेक चित्रपटांत झळकल्या, पण त्यांना हवी असलेली लोकप्रियता मिळत नव्हती.
१९७६ मधील ‘चलते चलते’ हा चित्रपट नाजनीन यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटात त्या खूप बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसल्या. चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली आणि नाजनीन रातोरात चर्चेत आल्या. या चित्रपटात त्या विशाल आनंद आणि सिमी गरेवाल यांच्यासोबत झळकल्या होत्या. या चित्रपटानंतर नाजनीन यांनी ‘हैवान’, ‘कोरा कागज’, ‘फौजी’, ‘निर्दोष’ आणि ‘ओ बेवफा’ अशा जवळपास २० ते २२ चित्रपटांत काम केलं.पण, त्यांना बहुतांश चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका मिळाल्या. कधी बहीण, कधी वहिनी, तर कधी मैत्रीण अशा भूमिकांमध्ये त्या दिसल्या. त्यांची मुख्य नायिकेची भूमिका साकारण्याची इच्छा होती, पण इंडस्ट्रीत त्यांना एका ठरावीक प्रतिमेतच अडकवून ठेवण्यात आलं.
बोल्ड सीन दिल्याने कामं मिळणं झालं बंद
नाजनीन यांनी बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम केलं. ‘चलते चलते’ या चित्रपटात त्यांनी बिकिनी परिधान केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्या काळात झीनत अमान आणि परवीन बाबी यांसारख्या अभिनेत्री बिकिनी लूकमुळे चर्चेत होत्या. त्या काळात बिकिनी घालणं ही मोठी गोष्ट मानली जात होती. यामुळे नाजनीन चर्चेत तर आल्या, पण त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर झाला. हळूहळू त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स मिळणं कमी झालं.
लाइमलाइटपासून आहेत दूर
नाजनीन यांना अशावेळी महाभारत मालिकेची ऑफर आली. बी. आर. चोप्रा यांनी त्यांना या मालिकेत कुंतीची भूमिका दिली. ही भूमिका नाजनीन यांनी इतकी हुबेहूब त्यांनी यापूर्वी चित्रपटांत बोल्ड दृश्यांमध्ये काम केलं होतं, हे कुणालाही जाणवलं नाही. या मालिकेनंतर त्यांनी इंडस्ट्रीपासून अंतरच ठेवलं. गेल्या अनेक वर्षांत त्या कुठे आहेत आणि कशा आहेत, याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही.मात्र, IMDbवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, त्यांनी खोजेमा मोहम्मद (Khozema Mohamed) यांच्याशी लग्न केलं असून त्यांना दोन मुली आहेत.
