Dharmendra Health Update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बरी नाही. ते बरे व्हावे यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना अनेक दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १२ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना त्यांच्या मुंबईतील घरी आणण्यात आले. आता त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. देओल कुटुंबीय धर्मेंद्र यांना त्यांच्या घरी का घेऊन गेले? याबद्दल रुग्णालयातील डॉ. प्रतीक समदानी यांनी सांगितलं आहे.
धर्मेंद्र यांना जुहू येथील त्यांच्या घरी नेण्यात आलं आहे. तिथेच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ब्रीच कँडीमधील डॉक्टर वेळोवेळी त्यांच्या तपासणीसाठी घरी जात आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती बरी नसूनही त्यांना घरी नेण्यात आल्याने चर्चा सुरू होती, आता डॉक्टरांनीच त्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. एबीपी लाइव्हने हे वृत्त दिलंय.
डॉ. ममदानी काय म्हणाले?
“काही कारणास्तव, सनी व बॉबी देओल हे दोघे भाऊ आणि त्यांची आई प्रकाश कौर यांची इच्छा होती की धर्मेंद्र यांनी घरी यावं, कारण तिथेच त्यांनी त्यांचं बहुतांशी आयुष्य घालवलं आहे. या कठीण काळात मी देओल कुटुंबाबरोबर आहे. मी देवाला प्रार्थना करतो की धरमजींची प्रकृती लवकर सुधारो,” असं डॉ. ममदानी म्हणाले.
धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्यामुळे संपूर्ण देओल कुटुंब तणावात आहे. हेमा मालिनी, ईशा देओल, सनी देओल आणि बॉबी देओल हे सर्वजण रुग्णालयात उपस्थित होते. हेमा मालिनी आणि ईशा देओल धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल सतत अपडेट देत आहेत. हेमा मालिनी यांनी सांगितलं की धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.
देओल कुटुंबाला वाटतेय धर्मेंद्र यांची काळजी
“धरमजींची प्रकृती आमच्यासाठी काळजीची बाब आहे. त्यांची मुलं झोपू शकत नाहीयेत. या काळात मी खचू शकत नाही, कारण खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. पण धरमजी घरी परतल्याने मी आनंदी आहे. आता ते त्यांच्या जवळच्या लोकांबरोबर आहेत. बाकी सगळं काही देवाच्या हातात आहे,” असं हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल म्हणाल्या.
दरम्यान, धर्मेंद्र यांना घरी नेल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी अमिताभ बच्चन गेले होते. ८३ वर्षांचे अमिताभ स्वतः गाडी चालवत धर्मेंद्र यांच्या घरी गेले आणि मित्राची विचारपूस केली. दुसरीकडे, घराबाहेर कॅमेरे घेऊन बसलेल्या पापाराझींवर सनी देओल भडकल्याचं पाहायला मिळालं. “तुमच्या घरी आई-वडील आहेत, तुम्हाला लाज वाटत नाही का?” असं तो म्हणाला.
