Actress Rekha Life Story: हिंदी चित्रपटसृष्टीची ‘उमराव जान’ म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची भुरळ आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. त्यांनी १९७० मध्ये ‘सावन भदो’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यावेळी रेखा जाड होत्या. पण त्यानंतर रेखा यांनी स्वतःमध्ये घडवून आणलेल्या बदलांविषयी त्यांचे भावोजी आणि अभिनेते तेज सप्रू यांनी भाष्य केलं आहे.
‘रेडिफ ओरिजिनल्स’च्या युट्यूब चॅनलशी बोलताना तेज सप्रू यांनी सांगितलं की, १९८७ मध्ये त्यांनी रेखा यांची सावत्र बहीण धनलक्ष्मी हिच्याशी लग्न केलं. पण त्याआधीपासूनच रेखा त्यांच्या बहिणीसारख्या होत्या. धनलक्ष्मी ही अभिनेत्री पुष्पावल्ली आणि सिनेमॅटोग्राफर के. प्रकाश यांची मुलगी आहे, तर रेखा या पुष्पावल्ली आणि अभिनेते जेमिनी गणेशन यांच्या कन्या आहेत. प्रेक्षकांच्या मनात रेखा यांच्याबद्दल असलेल्या गैरसमजांबद्दल बोलण्यास तेज यांनी नकार दिला. मात्र, रेखा यांनी कॅमेऱ्यासमोर स्वतःला बदलण्यासाठी जी प्रचंड मेहनत घेतली, त्याबद्दल खूप आदर असल्याचं त्यांनी नमूद केलं.
रेखा आधी जाड होत्या – तेज सप्रू
“एक अभिनेत्री म्हणून त्यांनी स्वतःला ज्याप्रकारे बदललं, तसं इतर कोणीही करू शकेल असं मला वाटत नाही. मी याचं संपूर्ण श्रेय त्यांनाच देतो. त्यांनी जेव्हा चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्या जाड होत्या, हे सर्वांनाच माहीत आहे. पण नंतर त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला,” असं तेज सप्रू म्हणाले.
रेखा यांचं कौतुक करत तेज सप्रू म्हणाले…
‘इंडियन आयडॉल’ या रियॅलिटी शोमध्ये रेखा यांना पाहून थक्क झाल्याचं तेज यांनी सांगितलं. “मी नुकतंच त्यांना इंडियन आयडॉलमध्ये पाहिलं. त्यांची नजाकत पाहून मी थक्क झालो. त्या एक उत्तम गायिकासुद्धा आहेत. त्या जेव्हा पत्र वगैरे लिहितात, तेव्हा त्यांची स्वाक्षरी आणि हस्ताक्षर… मी आजवर कोणाचेही तसे हस्ताक्षर पाहिलेले नाही,” असं तेज म्हणाले. “एक स्त्री जी आधी जाड होती, तिने स्वतःला बदललं आणि ज्या पद्धतीने हा बदल घडवून आणला, त्याचं मला खरोखरच खूप कौतुक वाटतं,” असं तेज रेखा यांच्याबद्दल म्हणाले.
सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे – रेखा
१९८० च्या दशकात सिमी गरेवाल यांच्या एका मुलाखतीत रेखा यांनी स्वतःमध्ये केलेल्या बदलांबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर “सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे. आणि सुंदर स्त्री बनण्यासाठी तुम्हाला शारीरिकदृष्ट्या फिट राहावं लागतं. जर तुम्ही बारीक राहू शकत असाल तर उत्तमच. पण जाड राहू नका. लठ्ठपणा अजिबात चांगला दिसत नाही,” असं रेखा म्हणाल्या होत्या.
तेज सप्रू व धनलक्ष्मी यांच्या लग्नाची गोष्ट
तेज सप्रू यांचं पहिलं लग्न झालं होतं आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. त्याच काळात रेखा यांनी त्यांची बहीण धनलक्ष्मी हिला अमेरिकेत मोठी बहीण राधाच्या घरी पाठवलं होतं. तिथे तिच्यासाठी स्थळ पाहणं सुरू होतं. “माझा घटस्फोट होत असतानाच, माझ्या बहिणीने अमेरिकेत धनलक्ष्मीला फोन करून तिथे लग्न करू नकोस असं सांगितलं. माझ्या कुटुंबियांना धनलक्ष्मी आवडत होती. हळूहळू मलाही ती आवडू लागली,” अशी आठवण तेज सप्रू यांनी सांगितली. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९८७ मध्ये त्यांनी धनलक्ष्मीशी लग्न केले. “मला वाटते की मी अगदी योग्य निर्णय घेतला,” असंही ते लग्नाबद्दल म्हणाले.
