‘कान्स २०२५’ या महोत्सवाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक कलाकार या ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर विविध लूक करताना दिसत आहेत. अशातच दोन दिवसांपुर्वी बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला रेड कार्पेटवर दिसली होती. ७८ व्या वार्षिक ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात ‘ओ एजेंट सीक्रेटो’च्या स्क्रीनिंगमध्ये उर्वशी रेड कार्पेटवर दिसून आली होती. यावेळी काळ्या सिल्क गाऊनमध्ये उर्वशी फार सुंदर दिसत होती.

यावेळी उर्वशी रेड कार्पेटवर आली आणि तिनं वेगवेगळ्या पोज देण्यास सुरुवात केली. पण तिनं जेव्हा सर्वांना अभिवादन करण्यासाठी हात उंचावला तेव्हा उर्वशीचा ड्रेस डाव्या हाताच्या काखेत उसवला असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. उर्वशीच्या या उसवलेल्या ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली.

उर्वशीच्या या लूकमधील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत “कान्समध्ये फाटलेला ड्रेस परिधान करणारी उर्वशी पहिली भारतीय अभिनेत्री” असं म्हटलं होतं. पण आता या ड्रेसबद्दल स्वत: अभिनेत्रीने खुलासा केला आहे. ‘आयएएनएस’शी साधलेल्या संवादात तिने याचं नेमकं कारण सांगितलं आहे.

यावेळी उर्वशी म्हणाली, “आम्ही कार्यक्रमासाठी जात असताना आमच्या वाटेत एक ७० वर्षांची वृद्ध महिला आली. तिला वाचवण्यासाठी आमच्या चालकाने लगेच गाडी थांबवली, ज्यामुळे आम्हाला धक्का बसला आणि आम्ही पुढे घसरलो. यात माझा गाऊन काखेत उसवला. तरीही त्या क्षणी मला त्याबद्दल काही वाटलं नाही. त्याऐवजी ती महिला सुरक्षित राहिल्याबद्दल आणि माझी ही कहाणी मला रेड कार्पेटवर सांगण्याबद्दल कृतज्ञता वाटली.”

तसंच यानंतर अभिनेत्रीने तिच्या या उसवलेल्या ड्रेसवरुन ट्रोल आणि टीका करणाऱ्यांनाही तिच्या खास शैलीत उत्तर दिलं. याबद्दल उर्वशी म्हणाली, “जे माझ्या ड्रेसबद्दल विनोद करत आहेत, त्यांच्यासाठी मी एक स्मितहास्य आणि यामागचं सत्य पाठवत आहे. कारण मला असं वाटतं की, सौंदर्य हे आपण परिधान करतो त्या कपड्यांमध्ये नसतं, तर आपण घेत असलेल्या निर्णयांमध्ये असतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उर्वशीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती नुकतीच सनी देओल, रणदीप हुडा यांच्या ‘जाट’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती लवकरच अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या कॉमेडी फ्रँचायझीमध्येही दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सोनम बाजवा, नाना पाटेकर, रितेश देशमुख, संजय दत्त, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, दिशा पटानीसह आणखी काही कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.