आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा दुसरा भाग ‘धुरंधर: द रिव्हेंज’, १९ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवे विक्रम रचतोय. पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागाने जास्त कमाई केली आहे. पहिल्या भागाची क्रेझ संपण्याआधीच निर्मात्यांनी दुसरा भाग रिलीज केला आणि या चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले. धुरंधर रिलीज झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा होतेय ती यातील कलाकारांची. या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा आहेत. त्यांनी या ‘स्पाय थ्रिलर’ चित्रपटाच्या कास्टिंग प्रक्रियेबद्दल माहिती दिली. ‘रेहमान डकैत’ या लोकप्रिय भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांनी नकार दिला होता, शेवटी ही भूमिका शेवटी अक्षय खन्नाने साकारली, असा खुलासाही छाबरा यांनी केला आहे.
‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना मुकेश म्हणाले, “मी या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर तब्बल चार तास मी स्तब्ध झालो होतो. मला इतका धक्का बसला होता की मी तिथून हललो देखील नाही किंवा कोणताही ब्रेक घेतला नाही. वेळ कसा गेला हे आम्हाला समजलंच नाही. याआधी अनेक चित्रपटांसाठी कास्टिंग करूनही सुरुवातीला मी थोडा घाबरलो होतो, कारण मला खूप सारे नवीन चेहरे आणि पात्र शोधायची होती. हा एक खूप मोठा चित्रपट होता.”
दोन्ही भागांसाठी ४०० लोकांचे कास्टिंग
“दोन्ही भागांचा विचार केला तर मला जवळपास ४०० लोकांचे कास्टिंग करायचे होते. त्यासाठी मी सहा जणांची टीम तयार केली आणि शोध सुरू केला. दिग्दर्शक आदित्य धरने मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं आणि जेवढा मोठा विचार करता येईल तेवढा करण्यास सांगितलं. कारण त्याला प्रेक्षकांना सरप्राईज द्यायचं होतं. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडेल आणि यातील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळेल, असा विश्वास आदित्यला आधीपासूनच होता,” असं मुकेश छाबरा म्हणाले.
सर्वात आधी रणवीरची निवड अन् दोन वर्षे…
‘धुरंधर’ चित्रपटासाठी सर्वात आधी रणवीर सिंहला घेण्यात आलं, असं त्यांनी सांगितलं. “कास्टिंगच्या प्रक्रियेत अनेक कलाकारांनी विविध भूमिकांना नकार दिला, पण दिग्दर्शक आदित्य धर डगमगला नाही. त्याने मला शांतपणे दुसरे पर्याय शोधायला सांगितलं. कलाकारांचा शोध घेणं आणि त्यांची निवड करणं यासाठी आम्हाला जवळपास दोन वर्षे लागली. आम्ही २०२४ च्या सुरुवातीला काम सुरू केलं होतं. ‘हमजा’च्या भूमिकेत रणवीर सिंहच असेल हे आमच्या मनात पक्कं झालं होतं. रणवीरलाही एक चांगला चित्रपट हवा होता, त्यामुळे त्याने लगेच होकार दिला,” असं मुकेश छाबरा म्हणाले.

रेहमान डकैतच्या भूमिकेसाठी अनेकांनी दिला नकार
अक्षय खन्नाने साकारलेल्या ‘रेहमान डकैत’ या भूमिकेबद्दल मुकेश म्हणाले, “मी कोणाची नावं घेणार नाही, पण २-३ मोठ्या कलाकारांनी या भूमिकेसाठी नकार दिला होता. मला खात्री आहे की आज त्यांना त्यांच्या निर्णयाचा पश्चात्ताप होतोय. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक आणि बॉलिवूडमधील दोन कलाकारांनी नकार देताना खूप विचित्र कारणं दिली होती. त्यांच्या मते, हा ‘मल्टीस्टारर’ चित्रपट असून यात फक्त रणवीर सिंहकडेच सर्वांचे लक्ष असेल. मात्र, आदित्य या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जात राहिला,” असं मुकेश छाबरा म्हणाले.
यालिना जमालीसाठी १,००० ऑडिशन्स
‘यालिना जमाली’च्या भूमिकेसाठी सारा अर्जुनची निवड कशी झाली, तेही मुकेश यांनी सांगितलं. “रणवीरबरोबर काम करण्यासाठी अनेक कलाकारांनी माझ्याशी आणि आदित्यशी संपर्क साधला होता. पण मला असा चेहरा हवा होता ज्याची कोणतीही जुनी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात नसेल. प्रेक्षकांना ती मुलगी ‘यालिना’च आहे असं वाटावं, अशी आमची इच्छा होती. आम्हाला हे पात्र सरप्राईज ठेवायचं होतं. या एका भूमिकेसाठी आम्ही १,००० पेक्षा जास्त ऑडिशन्स घेतल्या,” असं मुकेश छाबरा यांनी नमूद केलं.
दरम्यान, ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जगभरात १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, दानिश पांडोर आणि सारा अर्जुन यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
