Dhurandhar 2 Rakesh Bedi Casting : १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करीत आहे. कथा, गाणी तसेच दिग्दर्शन यांसह कलाकारांच्या अभिनयाचेही प्रेक्षक विशेष कौतुक करत आहेत.

‘धुरंधर २’ चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, दानिश पांडोर व सारा अर्जुनसह आणखी एका अभिनेत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे राकेश बेदी यांनी. चित्रपटात जमील जमाली ही भूमिका त्यांनी साकारली आहे.

मात्र ,‘धुरंधर २’मधील जमील जमाली या भूमिकेसाठी राकेश बेदी यांना पहिली पसंती नव्हती. त्याबद्दल ‘धुरंधर २’च्या कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी खुलासा केला आहे. जमील जमाली या भूमिकेमुळे राकेश बेदी सध्या खूप चर्चेत आहेत; पण या भूमिकेसाठी ते निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

Award Banner

“जमील जमाली भूमिकेसाठी २-३ अभिनेत्यांना विचारले होते, पण…”

‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना मुकेश छाबरा म्हणाले, “या भूमिकेसाठी सुरुवातीला २-३ अभिनेत्यांना विचारले होते; पण त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला. मग मी दिग्दर्शक आदित्य धरशी चर्चा करून राकेश बेदी यांचे नाव सुचवले. अनेकदा कलाकारांना एकाच पठडीतील भूमिका दिल्या जातात; पण ते बदलणे गरजेचे आहे. जेव्हा राकेश बेदी यांना फोन केला, तेव्हा त्यांनी कोणताही विचार न करता, लगेच होकार दिला. विशेष म्हणजे, त्यांनी चित्रपटाची कथाही ऐकली नव्हती. केवळ विश्वासावर त्यांनी या प्रोजेक्टसाठी होकार दिला.”

“करिअरमध्ये पहिल्यांदाच इतके प्रेम मिळत आहे” – राकेश बेदी

पुढे मुकेश छाबरा म्हणाले, “जेव्हा एखाद्या अभिनेत्याला त्याच्या नेहमीच्या इमेजपेक्षा वेगळी भूमिका मिळते, तेव्हा तो प्रेक्षकांना थक्क करतो. राकेश बेदींच्या बाबतीतही तेच झाले. प्रेक्षकांना त्यांचे काम खूप आवडले. या भूमिकेनंतर त्यांना जे प्रेम मिळत आहे, ते खूपच खास आहे. राकेश बेदी यांनी स्वत: सांगितले, “४९ वर्षांच्या करिअरमध्ये मला पहिल्यांदाच इतके प्रेम मिळत आहे.” त्यामुळे त्यांचे कुटुंबही खूप आनंदी आहे.”

दरम्यान, आदित्य धरचा ‘धुरंधर २’ चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये आलेल्या ‘धुरंधर’चा दुसरा भाग आहे. पहिल्या भागाने जगभरात मोठी कमाई करीत अनेक रेकॉर्ड मोडले होते. त्यानंतर मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित झालेला हा दुसरा भागही अपेक्षेपेक्षा जास्तच यशस्वी ठरला. प्रेक्षकांबरोबरच बॉलीवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांनीसुद्धा या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. अजूनही चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.