CBFC Sensor Board New Members Pankaj Tripathi Preity Zinta: भारतीय मनोरंजन विश्वातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तब्बल ७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची म्हणजेच सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. शशी शेखर वेम्पती यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांच्या या नव्या टीमची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. पंकज त्रिपाठी, प्रीती झिंटा, सुनील शेट्टी यांच्यासोबतच मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड आणि वामन केंद्रे यांनाही यात स्थान मिळाले आहे.
शशी शेखर वेम्पती यांच्या अध्यक्षतेखालील ही नवीन कार्यकारिणी तातडीने त्यांची जबाबदारी सांभाळेल. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा किंवा पुढील आदेशापर्यंत असेल. यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यात आली होती. २०२० मध्ये कार्यकाळ संपूनही नवीन बोर्डाची स्थापना न झाल्यामुळे, नियमानुसार नवीन नियुक्ती होईपर्यंत जुनेच सदस्य पदावर कार्यरत होते.
सेन्सॉर बोर्डाच्या नवीन कार्यकारिणीचे सदस्य
सेन्सॉर बोर्डाच्या नव्या टीममध्ये चित्रपट समीक्षक विनोद अनुपम, अभिनेता मनोज जोशी, चित्रपट निर्माते अभिषेक जैन, गायक आणि माजी खासदार हंसराज हंस, निर्माती सुप्रिया यारलागड्डा, कवी व लेखक यतींद्र मिश्रा आणि अभिनेत्री रुपाली गांगुली यांचा समावेश आहे. रंगमंच संचालक वामन केंद्रे आणि लेखक रमेश पतंगे हे जुन्या बोर्डातील असे दोनच सदस्य आहेत, ज्यांना नव्या बोर्डातही कायम ठेवण्यात आले आहे.
मावळत्या कार्यकारिणीचे सदस्य
मावळत्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन, चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री, माजी फुटबॉलपटू मिहिर भुतिया, अभिनेत्री गौतमी तडिमल्ला, वाणी त्रिपाठी टिक्कू, जीविता राजशेखर आणि चित्रपट निर्माते नरेश चंद्र लाल यांच्यासह वामन केंद्रे व रमेश पतंगे यांचा समावेश होता. नव्या कार्यकारिणीत विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी पल्लवी जोशींना सामील करण्यात आलंय. त्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या निर्मात्या व अभिनेत्री आहेत.
सेन्सॉर बोर्डातील १८ नव्या सदस्यांची यादी
१. विनोद अनुपम
२. मनोज जोशी
३. अभिषेक जैन
४. रिकी केज
५. प्रियदर्शन
६. सुनील शेट्टी
७. हंसराज हंस
८. सुप्रिया यारलागड्डा
९. यतींद्र मिश्रा
१०. रुपाली गांगुली
११. प्रीती झिंटा</p>
१२. नीलमधब पांडा
१३. पंकज त्रिपाठी
१४. प्रोसेनजीत चॅटर्जी
१६. पल्लवी जोशी
१६. निशिगंधा वाड
१७. वामन केंद्रे
१८. रमेश पतंगे
