Celina Jaitly Deep Neck Blouse Raksha Bandhan Controversy: क्रिती सेनॉनच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून वाद सुरू असताना आता आणखी एका अभिनेत्रीने सणाला डीपनेक ब्लाऊज परिधान केला आहे. क्रितीने ब्रालेट स्टाइल ब्लाऊज स्टाइल केला होता; त्यामुळे क्रितीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. यानंतर आता सेलिना जेटली हिनेसुद्धा डीप नेकलाइन असलेला ब्लाऊज परिधान केल्याने नेटकऱ्यांनी तिला फटकारले आहे.

सेलिना जेटलीने कॅन्सर रुग्णांबरोबर रक्षाबंधन सण साजरा केला. त्यांच्याबद्दल प्रेम आणि भावना व्यक्त करीत त्यांना राखी बांधली. यावेळी सेलिनाने लाल रंगाची फ्लोरल पॅटर्न असलेली साडी नेसली होती. यासह तिने स्लीव्हलेस आणि डीप-नेक ब्लाऊज स्टाइल केला होता. रक्षाबंधनाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सण साजरा करताना अभिनेत्रींनी परिधान केलेल्या कपड्यांवरून वाद सुरू असताना सेलिनावर टीका केली जात आहे.

सेलिना जेटलीच्या रक्षाबंधन लूकवर नेटकऱ्यांची नाराजी

काही नेटकऱ्यांनी तिने कॅन्सरग्रस्त रुग्णांबरोबर सण साजरा केल्याने तिचे कौतुक केले आहे, तर काहींनी तिच्या कपड्यांवरून नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “हे सगळं चांगलं आहे पण साडीचा पदर कुठे चालला आहे ते पण बघा…” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “पण असे कपडे घालण्याची गरज काय आहे?” तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिले, “रक्षाबंधनसारख्या पवित्र सणाला अशाप्रकारचे कपडे का घातले जात आहेत माहीत नाही.”

क्रिती सेनॉन रक्षाबंधन जाहिरात वाद

क्रिती सेनॉनने ‘जीवा’ ब्रॅण्डच्या जाहिरातीमध्ये सण साजरा करताना ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रालेट-स्टाईल ब्लाउज, त्यावर केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला होता. तिचा हा पोशाख रक्षाबंधनासाठी शोभत नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. यावर कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया देत, ‘तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी बांधाल का? असा प्रश्न उपस्थित केला. यावरून सोशल मीडियावर वाद झाल्यानंतर जाहिरात हटवण्यात आली. यावरून चर्चा सुरू असताना सेलिना जेटलीनेसुद्धा डीप-नेक ब्लाऊज परिधान करत रक्षाबंधन साजरे केले आहे.

सेलिना जेटलीचे भाऊ बू धाबीमध्ये ताब्यात

दरम्यान, सेलिना जेटलीचे भाऊ भारतीय लष्करातील निवृत्त मेजर विक्रांत कुमार जेटली आहेत. त्यांना गेल्या दोन वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) अबू धाबीमध्ये तुरूंगात ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आरोपांमुळे यूएईच्या प्राधिकरणाने त्यांना ताब्यात घेतले असून यासंबंधित भारतीय परराष्ट्र मंत्रालय हे यूएई सरकारच्या संपर्कात असून त्यांना सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विक्रांत जेटली यांच्या सुटकेसाठी सेलिनाने दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. रक्षाबंधनानिमित पोस्ट करत सेलिनाने भावाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.