Celina Jaitly Divorce : सिनेविश्वातील अभिनेत्री व मॉडेल सेलिना जेटली ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिचा ऑस्ट्रियन पती पीटर हाग याच्याबरोबर घेतलेला घटस्फोट आणि कौटुंबिक वाद यांमुळे ती चर्चेत असते. या घटस्फोटाचे अनुभव ती अनेकदा शेअर करत असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली सेलिना ही तिचे वैयक्तिक आयुष्यातील अपडेट सांगत असते. तिच्या मुलांना तिला भेटू दिले जात नसल्याची खंत तिने व्यक्त केली होती. त्यानंतर आता घटस्फोटाची नोटीस मिळाल्याचा दिवस हा आयुष्यातील सर्वांत कठीण क्षणांपैकी एक असल्याची कबुली तिने दिली आहे. तिला पतीकडून आलेली घटस्फोटाची नोटीस ही जर्मन भाषेत असल्यामुळे स्वतःला ती वाचता आली नाही. अखेर तिच्या मुलांनीच तिला घटस्फोटाची नोटीस वाचून दाखवल्याचा अनुभव सेलिना जेटली हिने सांगितला आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत सेलिना जेटलीने तिच्या वैवाहिक आयुष्यातील कटू अनुभव आणि घटस्फोटाच्या भावनिक आठवणी सांगितल्या आहेत. तसेच मुलांना भेटायचे असेल तर ऑस्ट्रियामध्ये नोकरी शोधावी लागेल, असे तिला सांगण्यात आल्याचे सेलिनाने सांगितले आहे. ती म्हणाली, “एका खास दिवशी मला घटस्फोटाची नोटीस मिळाली होती. आमच्या लग्नाचा १५ वा वाढदिवस असतानाच मला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. पीटर ती कागदपत्रे घेण्यासाठी म्हणून मला पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेला होता. पण, ती कसली कागदपत्रं आहेत आणि त्यात जर्मन भाषेमध्ये काय लिहिलं आहे हे त्यानं मला सांगितलं नाही,”

जर्मन भाषेतील घटस्फोटाची नोटीस मुलांनीच वाचून दाखवली

पुढे ती म्हणाली, “मला वाटलं की, ते नगरपालिकेकडून आलेलं एखादं पत्र किंवा घराच्या कागदपत्रांशी संबंधित काहीतरी असेल. त्यानं मला घराखाली सोडलं आणि मी चालत वर आले. माझी जुळी मुलं घरी त्यांचा अभ्यास करीत बसली होती. मी त्यांना विचारलं, ‘मुलांनो, यात काय लिहिलं आहे ते मला वाचून दाखवाल का? हे जर्मन भाषेत खूप अवघड असं लिहिलं आहे आणि याचं भाषांतर करायला माझ्याकडे जास्त वेळ नाही. त्यामुळे तुम्हीच मला सांगा यामध्ये काय लिहिलं आहे. त्यानंतर मुलांनी मला घटस्फोटाची ती भयंकर नोटीस वाचून दाखवली. त्यामध्ये माझ्यावर अनेक विचित्र आरोप करण्यात आले होते. माझ्या पतीच्या गरजा पूर्ण न करणं आणि आमचं वैवाहिक नातं पूर्णपणे बिघडवणं आणि ते कधीही सुधारणार नाही, अशा स्थितीमध्ये आणणं, अशी घटस्फोटाची कारणं त्यामध्ये लिहिली होती. त्यावेळी मला तर ही एखादी थट्टा किंवा गंमत आहे, असंच वाटलं.”

घटस्फोट घेण्याबाबत न्यायाधीशांनी सामंजस्याने वेगळे होण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर सेलिनाने लगेचच तिच्या पतीच्या वकिलांकडे सामंजस्याने वाद सोडवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. सेलिना म्हणाली, “मी सांगितलं होतं की, मला काहीही नकोय. मला फक्त माझी मालमत्ता आणि मी गुंतवलेले पैसे परत हवे आहेत, तसेच मुलांची दोघांना संयुक्त एकत्र कस्टडी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. यावर त्याच्या वकिलांनी पीटरशी बोलायला सांगितले होते. घटस्फोटानंतर मी मुंबईला परत येऊ शकणार नाही, असे वकिलांनी सांगितल्यावर मी त्याच्याशी बोलले. त्यावर मला सांगण्यात आले, ‘जर तुला मुलांना भेटायचे असेल, तर एखादी नोकरी शोध.’ मी विचारले, ‘मी इथे कोणती नोकरी करणार?’ त्यावर मला उत्तर मिळाले, ‘मी तुला सुपरमार्केटमध्ये साफसफाई करणाऱ्याची (क्लीनरची) नोकरी मिळवून देईन. इथे आम्ही अशा नोकऱ्यांकडे भारताप्रमाणे कमी दर्जाच्या म्हणून पाहत नाही.’ ”