Celina Jaitly : बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल सेलिना जेटली ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सेलिना जेटली हिचा घटस्फोट झाला असून, तिला तिच्या मुलांना भेटण्याची परवानगीदेखील नाकारण्यात आली आहे. आयुष्यातील या भावनिक टप्प्यातून जात असताना सेलिना हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वतःच्या मुलाच्या कबरीवर जाऊन ती धाय मोकलून रडली. या व्हिडीओवर कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी तिचे सांत्वन केले.
अभिनेत्री सेलिना जेटली हिने पती पीटर हाग (Peter Haag) याच्यासोबतच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या वैयक्तिक घडामोडींबाबत ती सोशल मीडियावर मुक्त चर्चा करत आहे. न्यायालयातील सुनावणीसाठी ती ऑस्ट्रियाला गेली होती; मात्र हा प्रवास तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी आठवणी देणारा ठरला.
सोशल मीडियावर सेलिना जेटली हिने भावनिक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये तिने तिचा मुलगा समशेरच्या कबरीला भेट दिली. त्यावर अगदी मायेने त्यावर फुले वाहिली आणि साफसफाई केली. तसेच तिने मुलाच्या आवडीची खेळणी ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली. यावेळी अभिनेत्री सेलिना जेटली हिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि मुलाच्या कबरीवर ती रडली. त्या एकाच मुलाला ती भेटली आणि तोदेखील या जगामध्ये राहिलेला नाही, अशा भावना तिने व्यक्त केल्या.
अभिनेत्री सेलिना जेटली हिने व्हिडीओद्वारे तिच्या पतीवर गंभीर आरोप केले. तिने लिहिले की, न्यायाधीशांसमोर लेखी हमी देऊनही तिने जन्म दिलेल्या मुलांना तिला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. तसेच, त्या मुलांना ‘अज्ञात स्थळी’ नेण्यात आले आहे. ती सौहार्दपूर्णतेने विभक्त होण्याची आशा बाळगून होती; मात्र प्रत्यक्षात तिला अवाजवी मागण्यांचा सामना करावा लागत आहे. या मागण्यांचा उद्देश माझ्याकडे अजूनही शिल्लक असलेल्या लग्नापूर्वीच्या मालमत्तेवर ताबा मिळवणे असल्याचा आरोप अभिनेत्री सेलिना जेटलीने केला. लग्नापूर्वीची आपली मालमत्ता ‘हिरावून घेण्याच्या’ उद्देशाने आपल्या मुलांचे मन वळवले जात असून, त्यांचे कान भरले जात असल्याचा आरोप सेलिनाने केला आहे.
नेटकऱ्यांनी अभिनेत्री सेलिना जेटलीला आधार देत तिचे सांत्वन केले. एकाने लिहिले आहे, “देवावर विश्वास ठेव. त्याचे तुझ्यावर लक्ष आहे. देव तुला या सगळ्यातून लवकरच बाहेर काढेल.” तर एका महिला नेटकऱ्याने, ‘मीसुद्धा तीन मुलांची आई आहे. माझं संपूर्ण जग ते आहेत. त्यांच्याशिवाय मी आयुष्य जगू शकत नाही. त्यामुळे तुझं दुःख मी पूर्णपणे समजू शकते,” असे लिहून खंबीर राहण्याचा सल्ला तिला दिला आहे.
