Where is Chain Kuli Ki Main Kuli actor Zain Khan now : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक असे कलाकार झाले आहेत, ज्यांनी खूप कमी वयातच स्टारडम मिळवलं आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली. बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर झळकताना त्यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने आणि निरागसतेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. अशाच काही कलाकारांनी लहान वयातच लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि भविष्यात ते मोठे स्टार बनतील, अशी अपेक्षा निर्माण केली.
२००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘चेन कुली की मेन कुली’ या चित्रपटात दिसलेला बालकलाकार झैन खान (Zain Khan) याचं नावही त्यात घेतलं जातं. बालकलाकार म्हणून झैनने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सुपरस्टार्सबरोबर काम केलं आणि चांगली लोकप्रियता मिळवली. पण अभिनय कारकिर्दीच्या शिखरावर असताना ‘चेन कुली की मेन कुली’मध्ये करणची भूमिका साकारणाऱ्या झैन खानने अभिनय सोडला. सध्या तो काय करतोय, हे जाणून घेऊया…
झैन खान कुठे आहे?
चाइल्ड आर्टिस्ट म्हणून झैन खानने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम करून चांगलं नाव कमावलं होतं. त्याचा अभिनय प्रवास ज्या पद्धतीने पुढे जात होता, त्यावरून तो भविष्यात मोठा स्टार बनेल, असं मानलं जात होतं. २०१० साली झैन खानने अचानक अभिनय सोडला आणि चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं. सध्या त्याच्या आयुष्याकडे पाहिलं तर तो सोशल मीडियावरही सक्रिय नाही आणि लाइमलाइटपासूनही दूरच राहतो.
‘जागरण’च्या वृत्तानुसार एका रेडिट पोस्टमधून झैनच्या लिंक्डइन प्रोफाइलची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, सध्या तो ऑनलाइन पेमेंट अॅप फोनपे मध्ये सेल्स हेड म्हणून काम करत असून मुंबईत राहतो. याआधी त्याने झोमॅटो आणि पेटीएमसारख्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही काम केलं आहे. झैन खानचा लूक आता खूप बदलला आहे आणि सध्या तो कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करून चांगली कमाई करत आहे.
झैन खानचे चित्रपट
झैन खानच्या अभिनय कारकिर्दीकडे पाहिलं तर ‘चेन कुली की मेन कुली’या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्येही दिसला. त्यामध्ये ‘परिणीता’, ‘चान्स पे डान्स’, ‘माय वाइफ्स मर्डर’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय झैन खान अभिनेता म्हणून प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘जस्सी जैसा कोई नहीं’मध्येही झळकला होता.
