तब्बू म्हटलं की आपल्यासमोर येते ती एक सुंदर आणि वास्तवदर्शी काम करणारी अभिनेत्री. तिच्या अनेक चित्रपटांमधून तिने तिच्या वेगळ्या आणि खास अभिनयाची छाप आपल्या मनावर सोडली आहे. स्मिता पाटील यांच्या ‘बाजार’ या सिनेमात तिने छोटीशी भूमिका साकारली. त्यानंतर १९८५ च्या ‘हम नौजवान’ या सिनेमातून तिने बाल कलाकार म्हणून काम केलं. १९९५ पासून ती खऱ्या अर्थाने व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करु लागली. तिला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला वाटलं होतं एक चित्रपट करु आणि आपलं आयुष्य जगू.. तसा निर्णय तिने खरंच घेतला असता तर एका सुंदर आणि तितक्याच ग्रेट अभिनेत्रीला आपण मुकलो असतो. आज याच तब्बूचा अर्थात तब्बसुम फातिमा हाश्मीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण जाणून घेऊ तिच्याविषयीचे काही माहीत नसणारे किस्से.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवानंद यांच्यामुळे मिळाला पहिला सिनेमा

अभिनेते देवानंद यांच्यामुळे तब्बू अर्थात तब्बसुम सिनेमासृष्टीत आली. ‘हम नौजवान’ या सिनेमासाठी एका लहान मुलीच्या शोधात देवानंद होते. त्यावेळी शबाना आझमीच्या घरी त्यांनी तब्बूला पाहिलं. शबाना आझमी तब्बूची मावशी होती. त्यामुळे शबाना आझमींच्या घरी तब्बूचं येणं जाणं कायमच होतं. एकेदिवशी देवानंद यांनी तिला पाहिलं आणि तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. त्यानंतर तब्बू सिनेमात पहिल्यांदा झळकली.

तब्बूने तिचं करिअर वेगळ्या पद्धतीने घडवलं यात शांकाच नाही.

तब्बू हे नाव कसं पडलं?

तब्बसुम फातिमा हाश्मी हे नाव असताना तब्बू नाव कसं पडलं हे देखील तब्बूनेच एका मुलाखतीत सांगितलं होतं. तब्बू हे माझं टोपणनाव आहे. मला घरात सगळे तब्बू हाक मारतात. देवानंद यांनी हे नाव ऐकलं. त्यांना ते वेगळं वाटलं. त्यामुळे ते म्हणाले की हेच नाव ठेवा.. तेच नाव लागलं आणि तब्बसुमची तब्बू झाली ती कायमचीच. मी तेव्हा लहान होते मला फार काही समजत नव्हतं… ते नाव झालं ते झालंच. असं तब्बूने सांगितलं होतं.

सिनेमात यायचं नव्हतं

अभिनेत्रीच व्हायचं असं तब्बूने कधीही ठरवलं नव्हतं. तिला चित्रपटांमध्ये फार रस नव्हता. मुंबईत उन्हाळ्याच्या सुट्टीत ती शबाना आझमी यांच्याकडे यायची. तिथे तिला देवानंद यांनी पाहिलं आणि ती अपघातानेच या क्षेत्रात आली. यानंतर तब्बूने तेलगू सिनेमात काम केलं. ज्याचं नाव होतं ‘कुली नंबर वन’ ज्याचा रिमेक नंतर हिंदीत आला होता. तसंच तब्बूचा हिंदी सिनेसृष्टीतली अभिनेत्री म्हणून पहिला सिनेमा होता ‘प्रेम’ संजय कपूर आणि तब्बू होते. पहिल्याच हिंदी सिनेमात तिने दुहेरी भूमिका साकारली. हा सिनेमा सुरुवातीला शेखर कपूर दिग्दर्शित करत होते. मात्र नंतर तो सतीश कौशिक यांनी पूर्ण केला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. पण सिनेमातली गाणी लोकांना आवडली..तसंच एक उंचपुरी आणि कमनीय बांधा असलेली अभिनेत्रीही सिनेमासृष्टीत आली. त्यानंतर तब्बूने विविध केले. ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘जीत’, ‘माचीस’, ‘साजन चले ससूराल’, ‘चाची ४२०’ अशी कितीतरी नावं घेता येतील.

‘अस्तित्व’ आणि ‘चांदनी बार’ टर्निंग पॉईंट

२००० मध्ये आलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अस्तित्व’ आणि २००१ मध्ये आलेला मधुर भांडारकरचा ‘चांदनी बार’ हे दोन चित्रपट तब्बूच्या सिनेमा करिअरमधले महत्वाचे टर्निंग पॉईंट ठरले. ‘अस्तित्व’ मधली आदिती श्रीकांत पंडित तिने ज्या खुबीने साकारली त्याला खरंच तोड नाही. एकदा विवाहबाह्य संबंध आल्यानंतर आणि ते २५ वर्षांनी पतीला समजल्यानंतर तिच्या आयुष्यात काय वादळ येतं? ते तब्बूने लीलया साकारलं होतं. खासकरुन ‘कितने किस्से है बस तेरे मेरे’ या गाण्यात तिचे जे हावभाव आहेत त्यातून तिच्या अभिनयाची खोली कळली. त्यानंतर आला ‘चांदनी बार’

मधुर भांडारकरने दिलेली कथा वाचून अस्वस्थ झाली होती तब्बू

‘चांदनी बार’ची कथा तब्बूला अस्वस्थ करुन गेली

‘अस्तित्व’मध्ये सोशिक पण नंतर बंड करणारी भूमिका साकारल्यानंतर तब्बूने प्रेक्षकांना ‘मुमताज’ ही ‘चांदनी बार’ मधली भूमिका साकारून प्रेक्षकांना आणखी एक धक्का दिला. हा सिनेमा मधुर भांडारकरने तब्बूसाठीच लिहिला होता. चित्रपटाची पटकथा वाचतानाच तब्बू हेलावून गेली होती. मधुर भांडारकरने दिलेली कथा वाचूनच तब्बू अस्वस्थ झाली होती. जे स्क्रिप्ट मधुर भांडारकरने लिहिलं होतं त्याच्या कव्हर पेजवर तब्बूचा फोटो होता. तब्बूला डोळ्यासमोर ठेवूनच त्याने ‘मुमताज’ ही भूमिका लिहिली आणि तब्बूने ती अजरामर केली. एका गँगस्टरच्या आयुष्यात एक बार गर्ल येते. ते दोघं लग्न करतात, तिला वाटतं आपण बारच्या या चक्रातून सुटलो पण जेव्हा गँगस्टरचा एन्काऊंटर होतो तेव्हा तिच्यावर पुन्हा बारमध्ये नाचण्याचीच वेळ येते. अतुल कुलकर्णी आणि तब्बू यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. तब्बूच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. या सिनेमासाठी तब्बूला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांचा वारसा चालवणारी तब्बू

समांतर सिनेमांचा काळ हा ऐंशीच्या दशकात होता. त्या काळातल्या दोन अभिनेत्री प्रत्येक समांतर सिनेमांमध्ये असायच्याच. त्यांची नावं होती शबाना आझमी आणि स्मिता पाटील. त्यांची भूमिका छोटी असली तरीही त्या केंद्रस्थानी असायच्या. तब्बूने हाच वारसा पुढे चालवला. आपण सिनेमात अगदी छोट्या भूमिकेत असलो तरीही ती भूमिका लक्षात राहण्याजोगी करायची हा ध्यासच तिने घेतला होता. १९९० ते २००० या कालावधीत समांतर सिनेमा बऱ्यापैकी लोप पावला होता किंवा समांतर सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा एकमेकांशी एकरुप झाले होते. अशा काळात तब्बूने वास्तववादी अभिनय करुन प्रेक्षकांची मनं जिंकली.

हलकं फुलकं कामही केलं

‘चिनी कम’, ‘हेराफेरी’, ‘गोलमाल रिटर्न्स’ अशा हलक्याफुलक्या चित्रपटांमध्येही तिने भूमिका केल्या. आपण फक्त गंभीर भूमिकाच नाही तर अशा भूमिकाही ताकदीने साकारू शकतो हे दाखवून दिलं. २००३ मध्ये आलेला ‘मकबूल’ आणि त्यानंतर २०१४ मध्ये आलेला ‘हैदर’ या दोन चित्रपटांचा विशेष उल्लेख करावा लागेल. ‘मकबूल’ हा सिनेमा शेक्सपिअरच्या मॅकबेथवर आधारीत होता. यातली तिने साकारलेली निम्मी ही आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘हैदर’ सिनेमातली गझाला मीरही तशीच. काश्मीरमध्ये होणारं अपहरण त्यातून ज्यांना ‘हाफ विडोज’ म्हटलं जातं अशा महिलांचं दुःख हे सगळं तब्बूने तिच्या खास शैलीत मांडलं. ‘द नेमसेक’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या इंग्रजी चित्रपटांमध्येही तिने काम केलं. तब्बूला हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलगू, बंगाली आणि तमिळ अशा सहा भाषा येतात. त्यामुळे तिला कुठल्याही भाषेत काम करण्यात अडचण आली नाही.

‘दृश्यम’मधली मीरा देशमुख आजही स्मरणात

२०१५ मध्ये आला दृश्यम या सिनेमात तब्बूने तडफदार आयजी मीरा देशमुख साकारली. अजय देवगण आणि तब्बू यांच्या अभिनयाची जुगलबंदी या सिनेमात पाहण्या मिळाली. या सिनेमाच्या सिक्वलमध्येही तिने त्याच तडफेने काम केलं. ‘कुत्ते’ या चित्रपटातही तिने महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. खास भाषेत शिव्या देताना आणि लाच घेण्यासाठी काहीही करायला तयार असलेली तब्बू हा पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी धक्काच होता. ‘अंधाधुन’ या चित्रपटात तिने साकारलेली सिमी सिन्हाही तशीच. स्वार्थासाठी प्रसंगी खून करणारी आणि आपलं ‘सत्य’ लपवण्यासाठी आकाशला (आयुष्मान खुराना) अंध करणारी सिम्मी प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

अनेक वैविध्यपूर्ण भूमिका आणि राष्ट्रीय पुरस्करांवर नाव कोरणारी तब्बू आता ५२ वर्षांची झाली आहे. मात्र तिच्या खास अभिनयात तसूभरही फरक पडलेला नाही. ‘खुफिया’ या नुकत्याच आलेल्या सिनेमात तिने ते दाखवून दिलं आहे. जेव्हा एखादा कलाकार त्याचं सर्वस्व पणाला लावून काम करतो तेव्हा लोक त्याचं वय पाहात नाहीत त्याचं काम पाहतात. तब्बूच्या बाबतीत हे अगदीच खरं आहे.

अजय देवगणमुळे अविवाहित

तब्बू आजही अविवाहीत आहे. त्याचं कारण अजय देवगण आहे असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. “मी आणि अजय एकाच महाविद्यालयात होतो. आम्ही अभ्यास कमी आणि मजा-मस्तीच जास्त करायचो. मात्र अजय आणि त्याच्या मित्रांनी माझ्यावर असं लक्ष ठेवलं होतं की माझ्या आसापास ते इतर कुणालाही फिरकू देत नसत. त्यामुळे माझं लग्न होता होता राहिलं.” असं तब्बूने मिश्किलपणे सांगितलं होतं. तब्बू ही अत्यंत गुणी अभिनेत्री आहे हे तिने वारंवार सिद्ध केलं आहे. फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार अशा पुरस्कारांवर तिने तिचं नाव कोरलं आहे. अशा या वेगळ्या शैलीच्या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandni bar movie was written for tabu the story that changed her career scj