Amitabh Bachchan’s first outing post hospitalisation: अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात आहे. ८३ वर्षांचे अमिताभ बच्चन आजही तितक्याच ऊर्जेने व समर्पणाने काम करतात. त्यांच्याबरोबर काम करणारे सहकलाकार त्यांच्या वक्तशीरपणाचे, शिस्तबद्ध जीवनशैलीचे आणि कामाप्रतिच्या त्यांच्या समर्पणाबद्दल नेहमीच बोलताना दिसतात.
अमिताभ बच्चन विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सध्या ते कल्की २ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. सिनेमातील त्यांचा लूक काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला होता. बिग बी चित्रपटांबरोबरच कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करतात.
या शोमध्ये स्पर्धकांशी बोलताना ते अनेक किस्से सांगतात. तसेच, स्पर्धकांबद्दल नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ते कायमच उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. त्याबरोबरच ते त्यांच्या ब्लॉगमधून चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतात. अनेक अनुभव सांगतात. काही वेळा कुटुंबीयांचे कौतुक करतात. चाहते त्यांच्या चित्रपटांना, सोशल मीडियावर पोस्टना भरभरून प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळते.
चाहते अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात. अमिताभ बच्चन दर रविवारी त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटतात. काही वेळा ते त्यांना भेटवस्तूही देतात.
आजारपणाच्या चर्चांनंतर चाहत्यांना भेटले अमिताभ बच्चन
या रविवारी (२४ मे २०२६)लादेखील चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्याबाहेर गर्दी केली होती. अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना भेटले. यावेळी त्यांना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अमिताभ बच्चन यांच्या भेटीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये एक चाहता चक्कर येऊन पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हामुळे तो चक्कर येऊन पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला पाणी वगैरे देऊन, मदत करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “माहीत नाही, लोक एवढ्या गर्दीत का जातात?”, दुसऱ्या एकाने लिहिले, “जीवावर बेतेपर्यंत लोक त्यांना का महत्त्व देतात”, आणखी एकाने लिहिले, “इतकेही वेडेपण असायला नाही पाहिजे”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने अमिताभ बच्चन यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले जाते होते. मात्र, त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. त्यानंतर ते पहिल्यांदाच चाहत्यांना भेटले.
दरम्यान, चाहते अमिताभ बच्चन यांच्या कल्की २ या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
