Chetak Screen Awards 2026 : ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ हा पुरस्कार सोहळा ५ एप्रिल रोजी मुंबईत पार पडला. १९९५ मध्ये ‘स्क्रीन अवॉर्ड्स’ची सुरुवात झाली होती. स्क्रीन अवॉर्ड्स हे भारतीय चित्रपटसृष्टीतील कलागुणांना सन्मानित करणारं एक महत्त्वाचं व्यासपीठ राहिलं आहे. यंदाही हिंदी चित्रपटसृष्टीत आणि ओटीटी (OTT) माध्यमांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक कलाकारांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’मध्ये अक्षय खन्नाला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ (पुरुष) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, यंदा ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ ठरली आहे शालिनी वत्स. तिचा ‘होमबाउंड’ चित्रपटासाठी सन्मान करण्यात आला.

‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ (पुरुष) या श्रेणीत अक्षय खन्नासह ‘धुरंधर’साठी राकेश बेदी, ‘गुस्ताख इश्क’साठी नसीरुद्दीन शाह, ‘जॉली एलएलबी ३’साठी सौरभ शुक्ला आणि ‘जुगनूमा: द फेबल’साठी दीपक डोबरियाल यांना नामांकन मिळालं होतं. अखेर यामध्ये अक्षय खन्नाने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. राज बब्बर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला; मात्र, अक्षय या सोहळ्याला उपस्थित राहिला नव्हता.

बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्ट, विनोदवीर झाकीर खान आणि सुनील ग्रोव्हर, तसेच ज्येष्ठ पत्रकार सौरभ द्विवेदी (संपादक – हिंदी, द इंडियन एक्सप्रेस) यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.

सिनेगृहात प्रदर्शित झालेले चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट अशा एकूण ३१ श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले गेले. आदित्य धरच्या ‘धुरंधर’ या ‘स्पाय थ्रिलर’ चित्रपटाला सर्वाधिक २४ नामांकनं मिळाली होती, त्यापैकी या चित्रपटाने १४ पुरस्कार पटकावले आहेत.

‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’बद्दल थोडक्यात…

‘The Indian Express Group’ द्वारे सुरू करण्यात आलेले Chetak Screen Awards हे भारतातील मनोरंजन विश्वातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक मानले जातात. महत्त्वाचं म्हणजे सर्व विजेत्यांची निवड प्रतिष्ठित ‘स्क्रीन अकादमी’ने केली आहे. या अकादमीत ५३ नामवंत चित्रपट निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. ही एक स्वतंत्र आणि ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे.

‘Screen Academy’ मध्ये शुजित सरकार, दीपा मेहता, श्रीराम राघवन, राम माधवानी, गुनीत मोंगा कपूर, कबीर खान, करण जोहर, राजकुमार हिरानी, ​​रसूल पुकुट्टी, रीमा दास आणि विद्या बालन यांसारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे.