Chetak Screen Awards 2026 Best Film Winner: बॉलीवूडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यात सर्वांच्या नजरा ज्या ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पुरस्कारावर होत्या, तो अखेर नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ (Homebound) या चित्रपटाने पटकावला आहे. २०२५ मधील अनेक गाजलेल्या चित्रपटांशी असलेली तगडी स्पर्धा मोडून काढत ‘होमबाउंड’ने हा मानाचा किताब आपल्या नावावर केला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घायवान, निर्माते करण जोहर, आदर पूनावाला यांच्यासह अभिनेता विशाल जेठवा आणि ईशान खट्टर मंचावर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती नीता अंबानी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘होमबाउंड’च्या या विजयाने चित्रपट रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सोशल मीडियावर चित्रपटाच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ मधील सर्वात मोठा पुरस्कार ‘होमबाउंड’ (Homebound) या चित्रपटाला मिळाला आहे. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलीवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये या पुरस्कारासाठी मोठी चुरस होती, ज्यामध्ये ‘होमबाउंड’ने बाजी मारली. या श्रेणीमध्ये ‘होमबाउंड’बरोबर धुरंधर, छावा, धडक २, हक, सैयारा, सितारे जमीन पर आणि सुपरबॉईज ऑफ मालेगाव यांसारख्या चित्रपटांना नामांकनं मिळाली होती.

‘होमबाउंड’ चित्रपटाचा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिग्दर्शक नीरज घायवान, निर्माते करण जोहर आणि आदर पूनावाला, तसेच अभिनेता विशाल जेठवा आणि ईशान खट्टर मंचावर उपस्थित होते. नीता अंबानी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार चित्रपटाच्या टीमला प्रदान करण्यात आला.

Award Banner

या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खान आणि सुनील ग्रोव्हर, तसेच ‘द इंडियन एक्सप्रेस’ हिंदीचे संपादक सौरभ द्विवेदी यांनी केले.

‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’द्वारे सुरू करण्यात आलेले ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ हे भारतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि विश्वसनीय चित्रपट पुरस्कार मानले जातात. कलेचा गौरव हा केवळ गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि आदर यावरच आधारित असावा, या विश्वासातून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे. ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ चे नामांकन आणि विजेते यांची निवड ‘स्क्रीन अकादमी’ (SCREEN Academy) या स्वतंत्र आणि ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेने केली आहे. या अकादमीमध्ये ५३ नामवंत चित्रपट निर्माते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.

विजेते निवडण्याची पद्धत

शॉर्टलिस्टिंगनंतर स्क्रीन अकादमीने एका शिस्तबद्ध मतदान प्रक्रियेद्वारे चित्रपटांचे मूल्यमापन केले. लॉस एंजेलिसमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ येथील सिनेमा आणि मीडिया स्टडीजच्या प्रमुख आणि स्क्रीन अकादमीच्या स्कॉलर-इन-रेसिडेंस डॉ. प्रिया जयकुमार यांनी यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार केली होती.

या अकादमीमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सामील आहेत, ज्यात सुजित सरकार, दीपा मेहता, श्रीराम राघवन, राम माधवानी, कबीर खान, करण जोहर, राजकुमार हिराणी, आर. एस. प्रसन्ना आणि राजीव मेनन या दिग्दर्शकांचा समावेश आहे. तसेच कलाकार आणि इतर तज्ज्ञांमध्ये विद्या बालन, जॉन अब्राहम, प्रसेनजित चॅटर्जी, गुनीत मोंगा कपूर, मुकेश छाब्रा, पायल कपाडिया, रसूल पुकुट्टी आणि रिमा दास यांचा समावेश आहे.