Katrina Kaif And Vicky Kaushal: लवकरच चेतक स्क्रीन अवॉर्ड्स हा सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने या आधी पार पडलेल्या स्क्रीन पुरस्कार सोहळ्यांतील अनेक किस्से पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शाहरुख खान-सलमान खान यांचे भांडण का झाले होते, जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर ऋषी कपूर भावूक झाले होते, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी लेकीसाठी कोणती गोष्ट केली होती, असे अनेक किस्से पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

आज आपण स्क्रीन पुरस्कार सोहळ्यातील आणखी एक किस्सा जाणून घेणार आहोत. २०१८ च्या स्क्रीन पुरस्कार सोहळ्यातील हा किस्सा आहे.

कतरिना कैफला चिमुकल्यांनी शिकवला होता डान्स

विकी कौशल व आयुष्मान खुराना हे त्या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत होते. त्यांनी स्टेजवर कतरिना कैफला बोलावले, त्यावेळी आयुष्मान खुराना प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, जरी कतरिनाच्या डान्सचे मोठ्या प्रमाणात चाहते असले तरी काही गंभीर कोरिओग्राफर आज या सोहळ्यात उपस्थित आहेत, त्यांना कतरिनाला काही डान्स स्टेप्स शिकवायच्या आहेत.

Award Banner

आयुष्मानच्या या बोलण्यानंतर एक लहान मुलगी स्टेजवर आली. तिला पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या रेखा व आलिया भट्ट यांना आश्चर्य वाटले. तिने कतरिना कैफ, आयुष्मान खुराना आणि विकी कौशलला काही मजेशीर डान्स स्टेप्स शिकवल्या, तो डान्स पाहून प्रेक्षक हसू लागले.

त्यानंतर एक लहान मुलगा स्टेजवर आला, त्यानेही कलाकारांना काही डान्स स्टेप्स करून दाखवल्या. त्यानंतर त्याने कतरिना, आयुष्मान व विकीला तसाच डान्स करायला लावले.

कतरिना कैफही बॉलीवूडमधील सर्वोत्तम डान्सरपैकी एक आहे. शीला की जवानी, काला चष्मा, चिकनी चमेली अशी तिची अनेक गाणी गाजली आहेत. तिच्या डान्स स्टेप्स, एनर्जी यांमुळे तिची गाणी गाजतात. तसेच तिचे अनेक चित्रपटही लोकप्रिय ठरले आहेत. असे असले तरी २०१८ च्या स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात त्या लहान मुलांनी कतरिनाचे मन जिंकले होते.

याच सोहळ्यात विकी कौशल कतरिनाबद्दल जे बोलला होता, त्याची चर्चा होताना दिसली होती. कतरिनाबद्दल विकी कौशल म्हणालेला, “ती इतकी सुंदर आहे की कोणीही सहज तिच्या प्रेमात पडू शकते.”

या सोहळ्याच्या काही वर्षांनंतर विकी कौशल व कतरिना कैफ एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी २०२१ला लग्नगाठ बांधली, २०२५ मध्ये त्यांना मुलगा झाला.

सध्या कतरिना चित्रपटांत दिसत नसली तरी विकी कौशल एकापेक्षा एक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. लवकरच तो लव्ह अँड वॉर या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, चेतक स्क्रीन पुरस्कार सोहळा ५ एप्रिल २०२६ ला पार पडणार आहे.