Chetak Screen Awards 2026 : ५ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ची (Chetak Screen Awards 2026) सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पुरस्कार सोहळ्यामधील काही खास क्षणांची चर्चा होत आहे. असाच एक क्षण २०१६ मध्ये पाहायला मिळाला होता, जेव्हा अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर रेखा यांनी धावत जाऊन जया बच्चन यांची गळाभेट घेतली होती.
२०१६ मध्ये झालेल्या २२ व्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये अमिताभ बच्चन यांना ‘पिकू’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्यांनी रणवीर सिंहबरोबर शेअर केला होता. कारण-त्या वर्षी रणवीरलासुद्धा ‘बाजीराव मस्तानी’साठी गौरवण्यात आले होते. मात्र, या सोहळ्यातील पुरस्कारापेक्षा रेखा आणि जया बच्चन यांच्या भेटीनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
रेखा यांनी जया बच्चन यांना धावत जाऊन मारली होती मिठी
अभिनेत्री जया बच्चन आणि रेखा यांच्यात अनेक वर्षांपासून अबोला असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये नेहमीच रंगलेली असते. मात्र, २०१६ च्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये हे चित्र पूर्णपणे वेगळे दिसले. तब्बल तीन दशकांनंतर जया बच्चन आणि रेखा एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसल्या. दोघीही पारंपरिक पोशाखात अतिशय सुंदर दिसत होत्या. जेव्हा अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हा रेखा यांनी स्वतःहून जया यांच्याकडे जाऊन त्यांना प्रेमाने मिठी मारली होती.
अमिताभ बच्चन यांनी रणवीर सिंहला समर्पित केलेला पुरस्कार
अमिताभ बच्चन यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्या प्रकारे रेखा यांनी आनंद व्यक्त केला, तो पाहण्याजोगा होता. विजेते म्हणून अमिताभ बच्चन यांचं नाव जाहीर होताच जया आणि रेखा या दोघी त्यांच्या जागेवर उठून उभ्या राहिल्या होत्या. त्यानंतर बिग बी मंचावर ट्रॉफी घ्यायला गेले, तेव्हा रेखा अचानक जया यांच्याकडे आल्या होत्या. इतकेच नव्हे, तर त्यांनी प्रेमाने जया यांना मिठीसुद्धा मारली होती. त्यानंतर बिग बी पुरस्कार स्वीकारताना दोघी एकमेकींच्या बाजूला उभ्या राहिल्या होत्या. अमिताभ यांनी मंचावरून पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला होता. तसेच त्यांनी तेव्हाचा तो पुरस्कार रणवीर सिंहला समर्पित करीत असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘दो अंजाने’ चित्रपटापासून झाली होती. पडद्यावरील त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि त्यांच्या नात्याबद्दलही अनेक चर्चा होत्या. अमिताभ बच्चन यांनी यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु रेखा यांनी अनेकदा त्यांच्याबद्दलचे कौतुक उघडपणे व्यक्त केले आहे. ‘सिलसिला’ हा या दोघांचा एकत्र असलेला शेवटचा चित्रपट ठरला.
