मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ सोहळ्यात अभिनेत्री शालिनी वत्स हिने बाजी मारली आहे. ‘होमबाउंड’ (Homebound) या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला. शालिनीसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे, कारण या श्रेणीमध्ये दिव्या दत्ता, शीबा चड्ढा, डॉली अहलुवालिया आणि मंजिरी पुपाला यांसारख्या बलाढ्य कलाकारांचे नामांकन होते.

५ एप्रिलला पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’मध्ये चित्रपट आणि OTT क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात शालिनी वत्स हिला ‘होमबाउंड’ (Homebound) या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा पुरस्कार देण्यात आला. या श्रेणीत शालिनीबरोबर बरेच दमदार कलाकार नामांकित होते. यात ‘छावा’साठी दिव्या दत्ता, ‘हक’साठी शीबा चड्ढा, ‘सितारे जमीन पर’साठी डॉली अहलुवालिया आणि ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’साठी मंजिरी पुपाला यांचा समावेश होता.

मुंबईत झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात विकी कौशलच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, विनोदी कलाकार झाकीर खान आणि सुनील ग्रोवर, तसेच प्रसिद्ध पत्रकार सौरभ द्विवेदी (संपादक – हिंदी, द इंडियन एक्सप्रेस) यांनी केले.

‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’द्वारे सुरू करण्यात आलेले ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ हे भारतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि विश्वसनीय चित्रपट पुरस्कार मानले जातात. कलेचा गौरव हा केवळ गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि आदर यावरच आधारित असावा, या विश्वासातून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे. ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ चे नामांकन आणि विजेते यांची निवड ‘स्क्रीन अकादमी’ (SCREEN Academy) या स्वतंत्र आणि ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेने केली आहे. या अकादमीमध्ये ५३ नामवंत चित्रपट निर्माते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.

विजेते निवडण्याची पद्धत

शॉर्टलिस्टिंगनंतर स्क्रीन अकादमीने एका शिस्तबद्ध मतदान प्रक्रियेद्वारे चित्रपटांचे मूल्यमापन केले. लॉस एंजेलिसमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ येथील सिनेमा आणि मीडिया स्टडीजच्या प्रमुख आणि स्क्रीन अकादमीच्या स्कॉलर-इन-रेसिडेंस डॉ. प्रिया जयकुमार यांनी यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार केली होती.

या अकादमीमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सामील आहेत, ज्यात सुजित सरकार, दीपा मेहता, श्रीराम राघवन, राम माधवानी, कबीर खान, करण जोहर, राजकुमार हिराणी, आर. एस. प्रसन्ना आणि राजीव मेनन या दिग्दर्शकांचा समावेश आहे. तसेच कलाकार आणि इतर तज्ज्ञांमध्ये विद्या बालन, जॉन अब्राहम, प्रसेनजित चॅटर्जी, गुनीत मोंगा कपूर, मुकेश छाब्रा, पायल कपाडिया, रसूल पुकुट्टी आणि रिमा दास यांचा समावेश आहे.