Chetak Screen Awards: चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ येत्या ५ एप्रिल रोजी मुंबईत होणार आहेत. त्यानिमित्ताने आपण या पुरस्कार सोहळ्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत. असाच एक खास क्षण २०१६ च्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये पाहायला मिळाला होता. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी ‘पिकू’ चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा’ पुरस्कार जिंकला होता. विशेष म्हणजे, त्यांनी हा पुरस्कार रणवीर सिंहबरोबर विभागून घेतला होता. रणवीरला ‘बाजीराव मस्तानी’मधील कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला होता.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई आणि सोनाली बेंद्रे पुरस्कार देण्यासाठी मंचावर आले होते. विजेत्याची घोषणा करताना घई म्हणाले, “सर्वोत्कृष्ट अभिनेता… अरे देवा! एक असे दिग्गज अभिनेते जे गेल्या ४० वर्षांपासून चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत. महान अभिनेते अमिताभ बच्चन. आणि आता दुसरी आनंदाची बातमी- आणखी एक अभिनेता आहे जो पुढची ४० वर्षे राज्य करेल, तो म्हणजे माझा आवडता—रणवीर सिंह.”
अमिताभ बच्चन रणवीर सिंहला म्हणालेले…
अमिताभ बच्चन माईक हातात घेत घेऊन म्हणालेले, “मी स्क्रीन अवॉर्ड्सचे आभार मानतो, पण सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे रणवीर माझ्या अगदी शेजारी उभा आहे. तू आज इथे नसतास, तरीही मी हा पुरस्कार तुलाच समर्पित केला असता.”
बच्चन पुढे म्हणालेले, “शूजित दा (शूजित सरकार) यांचे आभार, ज्यांनी मला इतकी मजेशीर आणि आव्हानात्मक भूमिका दिली. या चित्रपटाचा मुख्य आधार आणि मुख्य व्यक्तिरेखा दीपिका आहे. या कथेची लेखिका देखील एक स्त्री आहे आणि संपूर्ण कथा एका स्त्रीभोवती फिरते. स्त्रिया आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत आणि पुढेही त्या समाजाचा भक्कम पाया राहतील. खूप खूप धन्यवाद.”
पाहा व्हिडीओ
होस्ट कपिल शर्माने नंतर रणवीर सिंहला विचारलं, “या ऐतिहासिक क्षणी तुला काही बोलायचं आहे का? सध्या तुझ्या मनात काय सुरू आहे?” रणवीर सिंह म्हणालेला, “हा कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे, कारण मी हा पुरस्कार अशा व्यक्तीबरोबर घतोय, ज्यांनी मला प्रेरणा दिली आणि ज्यांच्यामुळे माझ्या मनात अभिनेता बनण्याची इच्छा निर्माण झाली. आयकॉन, महान आणि दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन. सर, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.”
रणवीर सिंह पुढे म्हणालेला, “मला आणखी काही लोकांचे आभार मानायचे आहेत… माझ्या वडिलांचे आभार, प्रेक्षकांचे आभार, ज्यांनी ‘बाजीराव मस्तानी’ला इतकं प्रेम दिलं आणि चित्रपट खास बनवला. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार. भन्साळी सर, मी तुमचा ‘बाजीराव’ बनू शकतो असा विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.”
“माझ्या उत्कृष्ट सह-कलाकार प्रियांका आणि दीपिका यांचे आभार, ज्यांच्यामुळे माझा अभिनय आणखी चांगला झाला आणि ज्यांनी माझं आयुष्य सुंदर बनवलं,” असं रणवीर सिंह म्हणाला होता.
