चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ मोठ्या उत्साहात पार पडले. एकीकडे पुरस्कार दिले जात होते, भावुक भाषणं होत होती, दुसरीकडे स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खानने त्याच्या खास शैलीत कडू सत्य अत्यंत मजेशीर पद्धतीने मांडायचं ठरवलं. झाकीरने बॉक्स ऑफिसचे दिखावटी यश, ओटीटीवरील आकडेवारी अशा अनेक विषयांवर फिरकी घेतली. ‘धुरंधर’ चित्रपटाच्या यशावर सिनेसृष्टीने दिलेल्या प्रतिक्रियेवरही त्याने थेट भाष्य केलं.
चेतक स्क्रीन अवॉर्ड्सचे होस्ट आलिया भट्ट, सुनील ग्रोव्हर, झाकीर खान आणि सौरभ द्विवेदी होते. तब्बल सात वर्षांनी हा सोहळा पुन्हा दिमाखात पार पडला. द इंडियन एक्सप्रेस समूहाद्वारे १९९५ मध्ये या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती. या सोहळ्याला जावेद अख्तर विकी कौशल, करण जोहर, बॉबी देओलसह दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.
झाकीर खानने चित्रपटसृष्टीतील पुरस्कार संस्कृतीवर ओढले ताशेरे
चित्रपटसृष्टीतील पुरस्कार देण्याची पद्धत आणि ‘धुरंधर’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा यावर टिप्पणी करत झाकीर म्हणाला, “मी काही तंत्रज्ञांबरोबर उभा होतो. ते म्हणत होते की, जर सर्व पुरस्कार ‘धुरंधर’लाच द्यायचे होते, तर मग आम्हाला कशाला बोलावलं? तंत्रज्ञांबरोबर बसणं कधीही चांगले असते, कारण ते म्हणत होते की चला, किमान यावेळी पुरस्कार तरी मिळाला; पगार नाही मिळाला तरी चालेल, पण पुरस्कार तर मिळाला.”
सक्सेस पार्ट्यांवर झाकीरचे मत
मुंबईत ‘सक्सेस पार्टी’ साजरी करण्याचा आणि चित्रपटाच्या खऱ्या कामगिरीचा काहीच संबंध नसतो, असं म्हणत झाकीर खानने खिल्ली उडवली. “मी १० वर्षांपासून मुंबईत राहतोय आणि या १० वर्षांत मी एक खूपच कमाल गोष्ट पाहिली आहे, ती म्हणजे ‘सक्सेस पार्टी’. या पार्ट्यांचा यशाशी काहीही संबंध नसतो. चित्रपट चालो वा न चालो, चार लोकांनी तो पाहिला असो वा नसो, ३०० कोटींची कमाई तर आरामात होऊन जाते. हे कसं आहे माहितीये? माझा चित्रपट यशस्वी झाला की नाही, हे दुसरं कोणी ठरवणार नाही; हे फक्त मी आणि माझा निर्माता ठरवतो. आमचा केटरर ठरवतो. बरेचदा तर अर्ध्या क्रू मेंबर्सनी स्वतः तो चित्रपट पाहिलेला नसतो, तरीही सगळे जण पार्टी करत असतात,” असं झाकीर खान म्हणाला.
ओटीटीवरील शोच्या यशाबद्दल झाकीर खानची टिप्पणी
“मला सर्वात जास्त मजा तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपटांच्या यशाची वाटते. जर एखादा चित्रपट किंवा शो खूप गाजला आणि तुम्ही ओटीटी मॅनेजरला विचारलं की, ‘हा शो तर हिट झाला ना?’, तर ते म्हणतात, ‘नाही, याला हवे तसे व्ह्यूज मिळाले नाहीत.’ दुसरीकडे, एखादा अतिशय बकवास शो असतो, जो चार लोकांनीही पाहिलेला नसतो आणि हजारो लोक त्या शोला शिव्या देत असतात. अशा शोबद्दल जर तुम्ही विचारलंत की, ‘हा शो तर फ्लॉप झाला’, तर ते म्हणतात, ‘नाही, आमच्यासाठी याला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.’ त्या शोचा कधीच दुसरा सीझन येत नाही, पण तरीही त्यांचं मात्र सुरूच असतं की, ‘याला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत’,” असं झाकीर खान म्हणाला.
धुरंधरच्या यशाबद्दल झाकीर खानचं वक्तव्य
झाकीरने पुढे बॉलीवूडकरांची फिरकी घेतली. सेलिब्रिटी सोशल मीडियावर धुरंधरचं कितीही कौतुक करत असले आणि अभिनंदनाच्या पोस्ट करत असले तरी खरं तर ‘धुरंधर’च्या अफाट यशामुळे चित्रपटसृष्टीतील प्रत्येक जण आनंदी नाही, असं झाकीरने म्हटलं. “तुम्ही कितीही अभिनंदनाच्या पोस्ट टाका, कितीही स्टोरीज शेअर करा किंवा जाहीर मुलाखतींमध्ये तो चित्रपट तुमचा आवडता असल्याचं सांगा, पण मित्रांनो, खरं तर ‘धुरंधर’च्या यशामुळे सगळ्यांचा चांगलाच जळफळाट झाला आहे. झालंय असं की बॉम्ब ल्यारीमध्ये फुटले पण त्याचा धूर मात्र वांद्रे ते जुहूपर्यंत सगळीकडे पसरलाय,” असं झाकीर खान म्हणाला.
