Vishal Jethwa delivers viral speech at Chetak Screen Awards : मुंबईत ५ एप्रिल रोजी ‘चेतक स्क्रीन अवॉर्डस्’ हा सोहळा पार पडला. यामध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ‘धुरंधर’, ‘सैयारा’ आणि ‘होमबाउंड’ सारख्या चित्रपटांनी या अवॉर्ड शोमध्ये पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीत ‘छावा’, ‘धुरंधर’, ‘सैयारा’, ‘सितारे जमीन पर’, ‘सुपर बॉईज ऑफ मालेगाव’ या चित्रपटांना नामांकनं मिळाली होती. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस व नीता अंबानी यांनी हा पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या टीमला प्रदान केला.
नीरज घेवान दिग्दर्शित ऑस्कर पर्यंत पोहोचलेल्या ‘होमबाउंड’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यावेळी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेला अभिनेता विशाल जेठवाने दिलेल्या प्रतिक्रियेने अनेकांचे लक्ष वेधलं. यावेळी त्याने मी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकण्यासाठी तयारी केलेली परंतु, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असं म्हणत गमतीशीर संवाद साधत खंतही व्यक्त केली. विशाल नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
दिग्दर्शकांनी व्यक्त केल्या भावना
नीरज घेवाण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आले तेव्हा ते म्हणाले, “पूर्वी जेव्हा मला स्क्रीन अवॉर्ड मिळाला होता तेव्हा मला असं वाटायचं की मी अधिक वेळ घेत आहे. परंतु, यावेळी मला असं वाटतंय की मी तो वेळ घेतला पाहिजे” यावेळी निरज यांनी नामांकन मिळालेल्या इतर मंडळींचे आणि स्वतःच्या टीम मधील सर्वांचे आभार मानले. यानंतर विशाल जेठवाने या क्षणाला अधिक खास करत देवेंद्र फडणवीस आणि नीता अंबानी यांच्या उपस्थितीत त्याच्या भावना व्यक्त केल्या.
विशाल जेठवाची प्रतिक्रिया
अभिनेता म्हणाला, “सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्काराचे भाषण तयार होतो पण, ती संधी मिळाली नाही. तसं विकी कौशल, सिद्धार्थ चतुर्वेदी यांना पाहिल्यानंतर मला कळून चुकलं होतं की मला काही संधी मिळणार नाही. पण, तरी स्टेजवर येण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. मुख्यमंत्री आणि नीता मॅम उपस्थित आहेत त्यामुळे माझे घरचेसुद्धा खूप आनंदी होतील.”
‘होमबाउंड’ या चित्रपटाबद्दल विशाल पुढे म्हणाला, “हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. स्वतःला स्वीकारण्याबद्दल चित्रपट भाष्य करतो आणि मीसुद्धा स्वतःचा स्वीकार केला आहे. त्यामुळे खूप आनंद होतो की अशा चित्रपटाचं कौतुक होत आहे आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. ज्या लोकांनी हा निर्णय घेतला त्या सर्वांचे आभार. इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप वाट पहावी लागते. १६-१७ वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यानंतर आता कुठे इतक्या दिग्गज मंडळींबरोबर उपस्थित राहण्याची संधी मिळाली.”
