छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा'(Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने कमाईचा मोठा आकडा गाठला आहे. सहा दिवसात चित्रपटाने २०३.२८ कोटींची कमाई केली आहे. संपूर्ण देशभरातून या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षक भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. याबरोबरच, विकी कौशलसह इतर कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. आता मात्र एका राज्याने हा चित्रपट करमुक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या राज्यात ‘छावा’ करमुक्त?
विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट मध्य प्रदेश राज्यात करमुक्त केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे. मोहन यादव यांनी त्यांच्या एक्स अकाउंटच्या पेजवर एका कार्यक्रमातील व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘छावा’ हा चित्रपट करमुक्त होईल, ही घोषणा करत आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे. त्यांनी खूप यातना सहन केल्या. आपल्या देश धर्मासाठी प्राण दिला”, असे म्हणत मध्य प्रदेशमध्ये ‘छावा’ चित्रपट करमुक्त केल्याची घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती के अवसर पर उनके पुत्र संभाजी महाराज पर आधारित हिन्दी फिल्म 'छावा' को टैक्स फ्री करने की घोषणा करता हूं… pic.twitter.com/b6dm1sDH7P
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) February 19, 2025
‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर शिवाजी सावंत यांच्या कांदबरीवर आधारित हा सिनेमा आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजी महारांजाचे जीवन दाखवण्यात आले आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसत आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. मॅडॉक ही या चित्रपटाची निर्माती कंपनी आहे.
दरम्यान, विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह रायगडावर हजेरी लावली होती. यावेळी त्याने कृतज्ञता व्यक्त केली. सोशल मीडियावर त्याने रायगडावरचे काही फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच मॅडॉक कंपनीने सोशल मीडियावर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारण्यासाठी विकी कौशलने कशी तयारी केली, याचा व्हिडीओ पाहायला मिळाला. त्यावर अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.