छाया कदम यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका ही वेगळी असते. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी अनेक विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. मराठीसह त्यांनी हिंदीतही काम केलंय. अशातच आता त्यांनी अजय देवगणच्या ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
छाया कदम यांनी संजय लीला भन्सळी, अमिताभ बच्चन ते अजय देवगण बॉलिवूडमधील अशा अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अजय देवगणच्या ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगत त्या चित्रपटासाठी आधी त्यांनी नकार दिल्याचं सांगितलं आहे.
छाया कमद यांनी ‘सिंघम रिटर्न्स’ला दिलेला नकार
‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटाबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “एक मुलगा आहे त्रुशांत इंगळे जो आधी कास्टिंग करायचा नंतर त्याने झोंबीवली चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. त्याने मला सांगितलं की असा असा चित्रपट आहे. तेव्हा मी आनंदी झाले की हिंदी चित्रपट आहे. पण त्यानंतर त्याने सांगितलं की एकच सीन आहे. पण एकच सीन असल्याने माझा हिरमोड झाला. मी त्याला सांगितलं मला मोठं काम असेल तर सांग मला हिंदी चित्रपटातच काम करायचं वगैरे कौतुक नाही. असं म्हणत मी त्यात फार रस दाखवला नाही आणि सोडून दिलं.”
छाया कदम पुढे म्हणाल्या, “पण त्रुशांत इंगळे खूपच मागे लागला होता. की करा ना खूप चांगला चित्रपट आहे. रोहित शेट्टीही आहे. तेव्हा मला असं झालं की ठिके तुझ्यासाठी करते मी. खरं सांगतेय मी त्याला आनदं मिळेल म्हणून तयार झाले आणि सेटवर गेले. तेव्हा सेटवर जेव्हा मला सीन हातात दिला तेव्हा त्यात फार काही लिहिलेलं नव्हतं. मलाच इंप्रोवाईज करायला सांगितलं. तोवर मी रोहित शेट्टीला भेटलेही नव्हते. मग मी सीन इंप्रोवाईज केला आणि मग जेव्हा सीन केला त्यावेळी एका टेकमध्ये सीन झाला आणि ते खूप आनंदी झाले.”
दरम्यान, अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये छाया कदम यांनी एकच सीन केला असला तरी तो चित्रपटातील महत्त्वाचा सीन मानला जातो. त्यांनी अजय देवगणने ज्या मुलाला मारलेलं असतं त्या मुलाच्या आईची भूमिका साकारली होती.
