‘मास्टर रवी’ या नावाने लोकप्रियता मिळवणाऱ्या रवी वालेचाचा प्रवास खूप वेगळा राहिला. तो भारताच्या पहिल्या काही लोकप्रिय बालकलाकारांपैकी एक होता. आपल्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या रवीने पुढे शेफ व्हायचं स्वप्न पाहून ‘आयआयएच मुंबई’मधून पदवी घेतली. त्यानंतर ताज हॉटेलमध्ये प्रोफेशनल शेफ म्हणून काम केलं आणि शेवटी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात स्वतःचं करिअर घडवलं. आता तो एका नामांकित कंपनीच्या प्रशासकीय विभागाचा प्रमुख आहे. रवीच्या अभिनयातील प्रवासाची सुरुवात चार वर्षांच्या रवी आणि दिग्गज अभिनेते शशी कपूर यांच्यातील एका अनपेक्षित प्रसंगाने झाली होती.
चार वर्षांच्या रवी वालेचाला कसा मिळालेला पहिला चित्रपट?
“माझा भाऊ ‘फकिरा’ चित्रपटावर काम करत होता, मी त्याच्याबरोबर सेटवर गेलो होतो. सेटवर प्रत्येक कलाकार आणि दिग्दर्शकासाठी स्वतंत्र खुर्च्या असायच्या. मी चार वर्षांचा आणि खूप धीट होतो. मी एका खुर्चीवर बसलो होतो, तेव्हा एक व्यक्ती शॉट संपवून माझ्याकडे आली. त्यांनी मला म्हटलं, ‘तू माझ्या खुर्चीवर बसला आहेस.’ मी म्हणालो, ‘पण मी बसलोय आणि मी उठणार नाही.’ त्यावर ते म्हणाले, ‘आपण यात काहीतरी मार्ग काढू शकतो का?’ मी म्हणालो, ‘ठीक आहे, करू शकतो. तुम्ही खुर्चीवर बसा आणि मी तुमच्या मांडीवर बसतो, चालेल ना?’ ती व्यक्ती दुसरी कोणी नसून शशी कपूर होते. त्यांना माझा आत्मविश्वास आवडला. त्यांनी लगेचच दिग्दर्शकाला मला या चित्रपटात कास्ट करायला सांगितलं,” अशी आठवण रवी यांनी एका मुलाखतीत सांगितली.
अशा प्रकारे रवी वालेचाने ‘फकिरा’ चित्रपटातून पदार्पण केलं. यात त्याने शबाना आझमी यांच्या चार वर्षांच्या मुलाची भूमिका साकारली होती. १९७६ मध्ये सुरू झालेला हा प्रवास पुढील १४ वर्षे सुरू राहिला. या काळात रवी यांनी हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा नऊ भाषांमधील आणि विविध चित्रपटसृष्टींमधील ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
रवी वालेचाने प्यायले होते सिंहिणीचे दूध
रवीने सहा वर्षांचा असताना के. परवेझ दिग्दर्शित ‘चीता मेरा यार’ या चित्रपटात काम केलं होतं. यात विनोद खन्ना, अमजद खान आणि नीतू सिंह होते. या चित्रपटात रवीने एका राजकुमाराची भूमिका साकारली होती. त्याचे अपहरण होते, तो पळून जातो आणि एका जंगलात पोहोचतो. हा चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. पण या चित्रपटातील एक प्रसंग रवीच्या आजही लक्षात आहे.
“चित्रपटात एक सीन होता जिथे एक सिंहिण तिच्या छाव्यांना दूध पाजत होती. तो लहान मुलगा रांगत तिथे जातो आणि तोही दूध पितो. हा सीन पूर्णपणे खरा होता, तिथे खरी सिंहिण आणि तिची पिले होती. मी खरोखरच सिंहिणीचे दूध प्यायलो होतो,” असं रवी वलेचाने एका मुलाखतीत सांगितलं.
१९८० च्या दशकात रवी वालेचा दिवसाला कमावायचा ३,००० ते ३,५०० रुपये
रवी वालेचाला अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या बालपणीची भूमिका साकारल्यामुळे लोकप्रियता मिळाली. त्याला ‘ज्युनिअर अमिताभ बच्चन’ असंही म्हटलं जायचं. बालकलाकार म्हणून करिअरच्या शिखरावर असताना, १९८० च्या दशकात तो दररोज ३,००० ते ३,५०० रुपये कमावत होता. महागाईचा दरानुसार पाहिल्यास आताच्या काळात रक्कम सुमारे ७५,००० ते ९०,००० रुपयांच्या बरोबरीची आहे.
“जसे राजेश खन्ना हे पहिले सुपरस्टार होते असं म्हणतात, त्याचप्रमाणे मास्टर रवी हा पहिला बालकलाकार होता. मी दिवसातून किमान चार शिफ्ट्स करायचो. त्याकाळी चित्रपट निर्मिती खूप महाग होती आणि रीलवर शूटिंग व्हायचे, त्यामुळे काम व्यवस्थित करावं लागायचं. मी कधीही रिटेक दिला नाही असा माझा रेकॉर्ड होता. कदाचित याच कारणामुळे दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माते मला घ्यायचे,” असं रवी वालेचा म्हणाला.
मी माझं बालपण गमावलं – रवी वालेचा
रवीने चौथ्या वर्षापासून १८ व्या वर्षापर्यंत काम केलं. “मी अनेक गोष्टी गमावल्या. आयुष्यात काहीतरी गमावल्याशिवाय काहीही मिळवता येत नाही. मी नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला, पण ४ ते १८ या वयात काम करत राहिल्याने मी माझं बालपण गमावलं. मी आठव्या वर्षी २४ वर्षांच्या व्यक्तीसारखा विचार करायचो,” असं रवी वालेचा म्हणाला.
ब्रेक घेतला, पुन्हा कोणी लाँच केलंच नाही – रवी वालेचा
चित्रपटसृष्टीत १४ वर्षे काम केल्यानंतर रवीने ठरवून अभिनयातून ब्रेक घेतला. “हा एक ठरवून घेतलेला ब्रेक होता. मी मनमोहन देसाईंच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं, त्यातला शेवटचा चित्रपट ‘गिरफ्तार’ (१९८५) होता. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. या चित्रपटानंतर त्यांनी मला काही काळ प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर काम करण्यास सांगितलं. ते मला मुख्य अभिनेता म्हणून लाँच करतील असं म्हणाले होते. दुर्दैवाने, याच काळात त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर मला कधीच लाँच केलं गेलं नाही,” असं रवी वालेचा म्हणाला.
प्रोफेशनल शेफ ते पायलट व्हायचं स्वप्न
ब्रेकनंतर चित्रपटसृष्टीत परतण्याऐवजी रवीने वेगळा मार्ग निवडला. स्वयंपाकाची आवड असल्याने रवीने ‘आयआयएच मुंबई’मध्ये प्रवेश घेतला. प्रोफेशनल शेफची पदवी घेतली आणि काही वर्षे ताज हॉटेलमध्ये काम केलं. आज रवी एका नामांकित कंपनीच्या प्रशासकीय विभागाचा प्रमुख आहे. “मला नेहमीच पायलट व्हायचं होतं. पण त्यासाठी विज्ञान शाखेत शिकावं लागायचं आणि ते कोर्सेस खूप महाग असायचे. आता मी आवड म्हणून फ्लाइंग शिकण्यासाठी बॉम्बे फ्लाइंग क्लबमध्ये अर्ज केला आहे. कोणत्याही गोष्टीसाठी वयाची अट नसते,” असं रवी वालेचा म्हणाला.
