हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीचा बहुप्रतीक्षित ‘मर्दानी ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुलींच्या बेपत्ता होण्याची आणि त्यांच्या अपहरणामागचे षड्यंत्र उलगडणारी कथा पाहायला मिळते आहे. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या अभिराज मिनावाला दिग्दर्शित ‘मर्दानी ३’च्या कलाकारांमध्ये सध्या खलनायिकेची भूमिका साकारलेल्या मल्लिका प्रसाद आणि जानकी बोडीवाला यांची विशेष चर्चा आहे. अजून एका चेहऱ्याने या चित्रपटात लक्ष वेधून घेतलं आहे ते मराठमोळी बालकलाकार अवनी जोशी हिने या चित्रपटात अवनी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली असून पहिल्यांदाच तिला अभिनेत्री राणी मुखर्जीबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे.

आजवर अनेक मराठी मालिका, रिॲलिटी शो आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जारण’ या चित्रपटातही अवनीने काम केले आहे. अवनी जोशी ही सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी आणि गायिका रसिका जोशी यांची मुलगी आहे. या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना अवनीने सांगितले, ‘यशराज फिल्मच्या टीमकडून मला ऑडिशनसाठी बोलवण्यात आले होते आणि या ऑडिशनमधून एक एक टप्पे पार पाडल्यानंतर ही भूमिका मिळाली.’

या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत असून राणी मुखर्जी आणि अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झळकण्याची संधी तिला या निमित्ताने मिळाली. त्यांच्या सोबत काम करण्याचा उत्तम अनुभव मिळाला आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्याचे तिने सांगितले. चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता चित्रपटालादेखील तितकाच उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी आशा असल्याचे बालकलाकार अवनी जोशीने आवर्जून सांगितले.