Urmila Matondkar Secret Marriage News: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. तिचा माजी पती मोहसीन अख्तर याने जून २०२६ मध्ये दुसरे लग्न केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. उर्मिलापासून घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच मोहसीनने संसार थाटला आहे. दरम्यान, उर्मिला मातोंडकर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला जातोय. ज्येष्ठ पत्रकार ज्योती व्यंकटेश यांच्या दाव्यानुसार, दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांनी उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या आंध्र प्रदेशातील एका मंदिरात झालेल्या गुपचूप लग्नाबाबत खुलासा केला होता.
मराठमोळी उर्मिला मातोंडकर तिच्या चित्रपटांइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. तिने २०१६ मध्ये तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या मोहसीनशी लग्न केलं होतं आणि ८ वर्षांच्या संसारानंतर, २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिचं हे लग्न आणि घटस्फोट याबद्दल सर्वांनाच माहीत आहे. पण त्याआधी उर्मिलाने लग्न केलं होतं, असा दावा केला जातो, त्याबद्दल जाणून घेऊयात.
चिरंजीवींनी ज्योती व्यंकटेश यांना विचारलेला प्रश्न
१९९० च्या दशकात उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा रिलेशनशिपमध्ये होते, अशी चर्चा होती. अर्थात दोघांपैकी कोणीही या गोष्टीची पुष्टी केली नाही. पण बॉलीवूडचे ज्येष्ठ पत्रकार ज्योती व्यंकटेश यांच्या मते, उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांनी एकमेकांशी लग्न केलं होतं. सिद्धार्थ कन्ननशी बोलताना ज्योती व्यंकटेश यांनी दावा केला की, अभिनेते चिरंजीवी यांनी ज्योती यांना विचारलं होतं की, तुम्ही उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या लग्नाची बातमी का केली नाही? चिरंजीवींचं बोलणं ऐकून ज्योती चक्रावून गेले. त्यांनी चिरंजीवींना विचारलं की त्यांना याबद्दल आणखी काही माहिती आहे का? यावर त्यांनी सांगितलं होतं की, या दोघांचं लग्न आंध्र प्रदेशातील एका मंदिरात झालं होतं.
चिरंजीवी यांनी दिला होता भटजींचा नंबर
ज्योती व्यंकटेश यांच्या मते, ज्या भटजीने या दोघांचं लग्न लावून दिलं होतं, त्याचा फोन नंबरही चिरंजीवी यांनी त्यांना दिला होता. ज्योती यांनी बातमीची पुष्टी करण्यासाठी उर्मिलाशी संपर्क केला होता, तेव्हा उर्मिला रडू लागली; तर दुसरीकडे राम गोपाल वर्मा यांनी यावर उत्तर देण्यास नकार दिला.
काय म्हणाली होती उर्मिला मातोंडकर?
“तुम्ही माझ्याबद्दल असं कसं लिहू शकता… मी इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यापासून तुम्ही मला ओळखता,” असं उर्मिला म्हणाली होती, असा दावा ज्योती व्यंकटेश यांनी केला. पण उर्मिला किंवा राम गोपाल वर्मा या दोघांपैकी कोणीही लग्नाच्या या बातम्यांना कधीही दुजोरा दिला नाही.
उर्मिला मातोंडकर व राम गोपाल वर्मा यांच्याबद्दलच्या चर्चा
राम गोपाल वर्मा यांनी ‘द्रोही’ चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान उर्मिलाला पाहिले होते. तिचा डान्स त्यांना खूप आवडला, मग त्यांनी आपल्या ‘रंगीला’ चित्रपटात तिला साईन केले. ‘रंगीला’ हिट झाल्यानंतर उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि दोघांमधील कथित जवळीक वाढू लागली. राम गोपाल वर्मा यांनी आपल्या एका चित्रपटातून माधुरी दीक्षितला काढलं आणि तिच्या जागी उर्मिलाला घेतलं तेव्हा दोघांबद्दलच्या चर्चांनी आणखी जोर धरला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या एका रिपोर्टनुसार, तेव्हा राम गोपाल वर्मा विवाहित होते. जेव्हा त्यांच्या पत्नीला उर्मिलाबरोबरच्या अफेअरबद्दल समजलं, तेव्हा तिने उर्मिलाच्या कानशिलात मारली होती.
