स्मिता पाटील या आज हयात नसल्या तरी मनोरंजन विश्वातील कलाकारांमध्ये त्यांच्याप्रती तितकाच आदर आहे. आजही त्यांच्या कामाचं कौतुक होतं आणि त्यांच्या चित्रपटांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम केलेले कलाकार अनेकदा त्यांच्याबद्दल बोलत असतात. अशातच जर इंडस्ट्रीत स्थान निर्माण करू पाहणाऱ्या कलाकाराची त्यांच्याशी तुलना झाली तर ते त्यांच्यासाठी अर्थातच मोठी गोष्ट ठरते. असंच काहीसं झालं लोकप्रिय अभिनेत्री चित्रागंदा सिंहबरोबर.

अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं तिच्या ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या पहिल्याच चित्रपटासाठी कौतुक झालं होतं. चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा किस्सा आठवताना चित्रांगदाने सांगितलं की, एक गृहस्थ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आले होते. चित्रपट संपल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्यामुळे ते स्टेजवर येऊन तिला भेटू शकले नाहीत.

अभिनेत्रीने सांगितला किस्सा

अभिनेत्री याबद्दल म्हणाली, “ते बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिले. त्यावेळी मी फिल्म इंडस्ट्रीत अगदीच नवीन होते आणि त्यांना ओळखतही नव्हते. त्यामुळे माझ्याकडे पाहणारे ते गृहस्थ कोण आहेत, असं मी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला विचारलं. तेव्हा मला सांगण्यात आलं की, ते केतन मेहता आहेत, ज्यांनी मिर्च मसालासह अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे.”

स्मिता पाटील यांच्याशी झालेल्या तुलनेबद्दल प्रतिक्रिया

चित्रांगदा पुढे म्हणाली, “ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, तू खूपच वेगळी आहेस. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्यांनी मला सांगितलं की, तुझ्यामुळे मला स्मिता पाटील यांची आठवण झाली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पुढे जाऊन माझं इतकं कौतुक होईल आणि माझी तुलना स्मिता पाटील यांच्याशी केली जाईल, याची मला कल्पनाही नव्हती. त्यानंतरही मी अनेक चित्रपट केले. स्मिता पाटील यांच्यासारखं काम करायचं किंवा त्यांच्यासारखं दिसायचं, असा विचार मी कधीच केला नव्हता.”

चित्रांगदा सिंह पुढे म्हणाली, “ज्यांनी माझी स्मिता पाटील यांच्याशी तुलना केली, त्यांची मी आभारी आहे. मी तर फक्त तेच काम केलं, जे सुधीर मिश्रा यांनी लिहिलं होतं. ते स्त्री व्यक्तिरेखा खूप सुंदर पद्धतीने लिहितात. त्यांना वाटलं की मी ही भूमिका साकारू शकते, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. त्यानंतर स्मिता पाटील यांच्याबरोबर काम केलेल्या केतन मेहता यांनी माझ्या पहिल्याच चित्रपटाची त्यांच्याशी तुलना केली, त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला.”

दरम्यान, चित्रांगदा सिंह आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर सुपरस्टार सलमान खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे.