Choreographer Geeta Kapoor Quits Bollywood : प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरने बॉलीवूड सोडलं आहे. तिने स्वतः एका मुलाखतीत यामागचं कारण सांगितलं आहे. असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून गीताने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ती ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘दिल तो पागल है’ सारख्या गाण्यासाठी फराह खानला असिस्टंट होती. मागील अनेक वर्षांपासून ती टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शोज जज करतेय. बॉलीवूडमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचं गीता कपूरने स्पष्ट केलं आहे.
‘हिंदी रश’ ला दिलेल्या मुलाखतीत गीता कपूरला विचारण्यात आलं की तू बॉलीवूडमध्ये पुनरागमन कधी करणार आहेस? बराच काळ झाला आहे, तू पुरेसा ब्रेक घेतलाय. त्यावर गीता म्हणाली, “नाही. मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीने एक पाऊल मागे जायला पाहिजे आणि नवीन प्रतिभावान लोकांना पुढे जाण्यासाठी संधी दिली पाहिजे.”
गीता कपूरने का सोडलं बॉलीवूड?
गीता पुढे म्हणाली, “आता इतरांनी पुढे जायची वेळ आली आहे. या इंडस्ट्रीने आपल्याला जे काही दिलं आणि काम, पैसा आणि प्रसिद्धीच्या बाबतीत जे काही आशीर्वाद दिले, ते मला मिळाले असं मला वाटते. पण आता जेव्हा एखादी संधी अशी येईल जी मला सोडावी वाटणार नाही, तेव्हाच कदाचित मी परतेन, नाहीतर परतणार नाही.”
इंडस्ट्रीत कामाची कमतरता
गीता कपूर म्हणाली, “सध्या इंडस्ट्रीमध्ये कामाची कमतरता आहे. त्यामुळे इतर लोकांना संधी दिली पाहिजे. आजकाल असे चित्रपट बनत नाहीत, जसे आमच्या काळात बनवले जायचे, त्यात ८-१० गाणी असायची. मोठी गाणी असायची. डान्सवर आधारित गाणी असायची. त्यामुळे आधीच काम कमी असताना तेही आम्ही हिसकावून घेणं आणि इतरांना संधी न देणं चुकीचं ठरेल. त्यामुळे त्या लोकांनी काम करावं. मी जिथे आहे तिथे मी आनंदी आहे.” गीता कपूर म्हणाली की तिला कोणत्याही बंधनात काम करायचे नाही. तिला कॉपी-पेस्ट काम करायचं, क्रिएटिव्ह काम करायचंय.
गीता कपूरने वयाच्या १७ व्या वर्षी तिच्या डान्सिंग करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ती फराह खानच्या ग्रुपमध्ये सामील झाली होती. तिने फराहला ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘दिल तो पागल है’ ‘कभी खुशी कभी गम’, ‘मोहब्बतें’, ‘कल हो ना हो’, ‘मैं हूं ना’ आणि ‘ओम शांती ओम’सह अनेक चित्रपटांमध्ये असिस्ट केले. गीता कपूरने फराहला तिच्या आईचा दर्जा दिला आहे आणि तिला आपला गुरूही मानते.