CINTAA Office Fight Video Poonam Dhillon Padmini Kolhapure Police Drama: मुंबईतील ‘सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ म्हणजेच ‘सिंटा’च्या (CINTAA) कार्यालयात शुक्रवारी बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्रींमध्ये तुफान राडा झाला. पूनम ढिल्लों, पद्मिनी कोल्हापुरे, उपासना सिंह, प्रीती सप्रू आणि कुनिका सदानंद या प्रसिद्ध अभिनेत्री भररस्त्यात आणि लोकांसमोर एकमेकांशी कचाकचा भांडताना दिसल्या. सिंटाची अधिकृत कागदपत्रे आणि डेटा गाडीतून पळवल्याचा आरोप कुनिका सदानंदने केल्यानंतर हा वाद पेटला. हा वाद इतका विकोपाला गेला की शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पोलिसांनी या अभिनेत्रींची कानउघाडणी करत “कमीत कमी तुमच्या प्रतिष्ठेचा तरी विचार करा” अशा शब्दांत खडे बोल सुनावले. या संपूर्ण भांडणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

CINTAA ची अधिकृत कागदपत्रे आणि फाइल्स पूनम ढिल्लों यांच्या गाडीत ठेवून नेण्यात येत असल्याचा आरोप कुनिका सदानंदने केला. त्यानंतर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये काही सदस्य यावरून पद्मिनी कोल्हापुरे यांना जाब विचारताना दिसत आहेत. ती कागदपत्रे नेल्याचे तुम्ही मान्य करत आहात का? असा प्रश्न विचारल्यावर पद्मिनी यांनी कमिटी बरखास्त झाल्याचे पत्र दाखवण्याची मागणी केली. यावर पोलीस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. तसेच पोलिसांसाठी सर्वजण सारखेच आहेत, असं म्हटलं. दुसरीकडे ‘आमचा डेटा चोरीला गेला आहे’, असा दावा पद्मिनी यांनी केला.

…तर कानाखाली मारली असती – पोलीस भडकले

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये, पूनम ढिल्लों त्यांच्या गाडीची तपासणी का केली जातेय? असा प्रश्न विचारताना दिसतात. हा व्हिडीओ कुनिकाने शूट केल्याचा अंदाज वर्तवला जातोय. पूनम कुनिकावरही संतापल्याचं दिसून आलं. वाद वाढल्यानंतर पोलीस म्हणाले, “आम्हाला असं म्हणताना वाईट वाटतंय, पण झोपडपट्टीत राहणारे लोकही अशा रितीने बोलत नाहीत. कमीत कमी तुमच्या प्रतिष्ठेचा तरी विचार करा, लोक पाहत आहेत. तुम्ही फक्त तुमच्या आरोपांवर ठाम आहात आणि आमचे ऐकत नाही आहात. दुसरं कोणी असतं तर कानाखाली मारली असती. आम्ही तुमचा आदर करतोय, पण त्यालाही एक मर्यादा आहे.”

उपासना सिंह यांनी कागदपत्रे परत मागवण्याची विनंती पोलिसांना केली, तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने चांगलंच सुनावलं. “हे माझं काम नाही. जर कागदपत्रांमध्ये काही छेडछाड झाली असेल, तर कामगार आयोग त्यांना ते सादर करायला सांगेल,” असं म्हणाले. पण तरीही सिंटाचे सदस्य एकमेकांशी आणि पोलिसांशी वाद घालत राहिले. निवडणुका जाहीर झाल्यामुळे कागदपत्रांना हात लावण्याची परवानगी नाही, असं कुनिका वारंवार सांगत असल्याचं व्हिडीओत ऐकू येतंय.

‘सिंटा’चा वाद नेमका काय?

ऑगस्ट महिन्यात सिंटाच्या ११ सदस्यांनी राजीनामे दिल्यावर वाद चव्हाट्यावर आला. एका संयुक्त निवेदनात या सदस्यांनी आरोप केला की, पूनम ढिल्लों, पद्मिनी कोल्हापुरे आणि पॅनेलमधील काही मोजक्या लोकांमध्ये पॅनलचं कामकाज चालतंय. सामूहिक निर्णय प्रक्रिया, विचारविनिमय आणि घटनात्मक नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे कारण देत या सर्वांनी राजीनामा दिला होता.