Cocktail 2 trailer released : दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटाने प्रेम आणि मैत्रीची नवी व्याख्या सांगितली होती. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये सैफ अली खान, दीपिका पादुकोण आणि डायना पेंटी यांच्या भूमिका गाजल्या होत्या. पुन्हा एकदा नव्या भावनांसह प्रेमाचा हाच गुंता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. येत्या १९ जून रोजी ‘कॉकटेल २’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ‘कॉकटेल २’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, यामुळे चित्रपटाबाबत नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
१४ वर्षांनंतर ‘कॉकटेल’ चित्रपटाचा सिक्वेल येणार असून यामध्ये अभिनेता शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. प्रेम, मैत्री, प्रवास आणि भावनांवर आधारित कथानक तरुणाईला आकर्षित करत आहे. ‘कॉकटेल २’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला असून त्यामध्ये लग्नाभोवती फिरणारा थरारक सस्पेन्स दाखवण्यात आला आहे, त्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. यामध्ये शाहिद कपूर हा कुणाल, रश्मिका मंदाना ही दिया आणि क्रिती सेनॉन ही अॅली हे पात्र साकारणार आहे. चित्रपटातील गाणी आणि डायलॉग जुन्या चित्रपटाची आठवण करून देत आहे.
प्रेमात मैत्री अन् मैत्रीमध्ये प्रेम
‘कॉकटेल २’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात शाहीद कपूरच्या नात्यावर आधारित डायलॉगने होत आहे. नवी मैत्री ही आनंद देणारी असली तरी प्रेम हे फाटलेल्या शर्टसारखे असते. यामध्ये मायेची ऊब असते, अशा डायलॉगने ट्रेलरची सुरुवात झाली आहे. प्रेमात मैत्री आणि मैत्रीमध्ये प्रेम अशा भावनांमध्ये अडकलेला ‘कॉकटेल २’ चित्रपट तरुणांमध्ये बदलेल्या नात्यांची गुंतागुंत मांडत आहे. ग्लॅमर, परदेशातील निसर्गरम्य लोकेशन्स आणि दोन्ही अभिनेत्रींचे स्टायलिश आउटफिट्स यामुळे चित्रपट अधिक आकर्षक वाटत आहे.
‘तुम ही हो बंधू’ या गाण्याचा रिमेक
‘कॉकटेल’ चित्रपटातील ‘तुम ही हो बंधू’ गाणे सुपरहिट ठरले होते. आजही या गाण्याचा मोठा चाहता वर्ग आहे. ‘कॉकटेल २’मध्येही हे गाणे असल्याचे ट्रेलरमधून लक्षात येत आहे. ‘तुम ही हो बंधू सखा तुम ही’ हे गाणे ट्रेलरमध्ये ऐकू येत आहे. मात्र, या गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे की पुन्हा एकदा तेच गाणे वापरले आहे हे अजून समोर आलेले नाही. पण, या गाण्याची चाल प्रेक्षकांना ‘कॉकटेल’ चित्रपटाशी कनेक्ट करत आहे.
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
‘कॉकटेल २’ चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अनेकांच्या मते, ट्रेलरवरून चित्रपट हटके आणि जबरदस्त कॉमेडी असणार आहे. नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या कथेचे आणि लोकेशनचे कौतुक केले आहे. तसेच लोकप्रिय स्टारकास्ट असल्यामुळे आधीच्या चित्रपटासारखी मजा येणार असल्याची उत्सुकता नेटकरी व्यक्त करत आहेत; तर काही नेटकऱ्यांनी मात्र चित्रपटाला ट्रोल केले आहे. ‘कॉकटेल २’ची तुलना जुन्या ‘कॉकटेल’ चित्रपटाशी करत असून, “यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांची कमतरता जाणवत आहे,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात आहेत.
