Odisha Train Accident : ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्थानकाजवळ घडलेला रेल्वे अपघात थरकाप उडवणारा आहे. शुक्रवारी रात्री (२ मे) हा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन व मालगाडीच्या भीषण अपघाताने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. या अपघातामध्ये मोठी जीवीतहानी झाली आहे. ‘एएनआय’च्या वृत्तानुसार आतापर्यंत या अपघातातील मृतांची संख्या २३८ इतकी झाली आहे तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सेलिब्रिटी मंडळीही दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
या भीषण अपघातानंतर संपूर्ण देशच हादरुन गेला आहे. सुरुवातीला मृतांची संख्या ३० असल्याचं समोर आलं होतं. पण ही संख्या नंतर वाढत गेली. सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य करण्याचे काम सुरु आहे. राजकीय मंडळीही मदत करण्यास पुढे सरसावले आहेत. दरम्यान या अपघाताचे फोटो व व्हिडीओ हादरवणारे आहेत.
आणखी वाचा – Odisha Train Accident : रेल्वेच्या इतिहासात आतापर्यंत झालेले सर्वात मोठे अपघात कोणते?
यामध्येच आता कलाक्षेत्रातील मंडळी सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त करताना दिसत आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या अपघाताबाबत एक ट्वीट केलं आहे. शिवाय त्यांनी ट्विटद्वारे एक संतप्त प्रश्न विचारला आहे. तसेच या अपघातात जीव गमावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
विवेक अग्निहोत्री म्हणाले, “दुःखद आणि अतिशय लज्जास्पद. एकाचवेळी तीन ट्रेनचा अपघात कसा काय होऊ शकतो? याला जबाबदार कोण? सगळ्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करतो. ओम शांती”. एकाच वेळी तीन ट्रेनचा अपघात होणं कसं शक्य आहे? असं विवेक अग्निहोत्री यांचं म्हणणं आहे. तसेच त्यांनी ट्वीट करत संतापही व्यक्त केला आहे.