Brett Lee reacts on Dating Preity Zinta : माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा आयपीएलमध्ये ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’चा (आताचे पंजाब किंग्ज) महत्त्वाचा गोलंदाज राहिलेला आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या शिखरावर असताना ब्रेट लीचे नाव बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. खासकरून पंजाब किंग्जची सह-मालकीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याबरोबर त्याच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. आयपीएल सामन्यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि जवळीक पाहून अफवा पसरत होत्या. आता या सर्व डेटिंगच्या चर्चांवर ब्रेट लीने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेट लीचं नाव आतापर्यंत अनेकदा बॉलीवूड अभिनेत्रींशी जोडलं गेलं, यात प्रीती झिंटाच्या नावाचाही समावेश आहे. मात्र, ब्रेट लीने सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. आपण बॉलीवूडमधील कोणत्याही अभिनेत्रीला कधीही डेट केलं नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.
बॉलीवूड अभिनेत्रींना डेट करण्याबद्दल ब्रेट ली म्हणाला…
प्रीती आपली चांगली मैत्रीण असून तिचा आदर करत असल्याचं ब्रेट लीने सांगितलं. “मी कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्रीला कधीही डेट केलं नाही,” असं ब्रेट ली ‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना म्हणाला. तसेच, मला सत्य माहितीये, त्यामुळे अशा अफवांचा कधीही फरक पडला नाही, असं त्याने सांगितलं. “लोक काय चर्चा करतात, याचा मला फरक पडत नाही, मी कधीही या गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही,” असं ब्रेट लीने स्पष्ट केलं.
प्रीती झिंटाबद्दल काय म्हणाला होता ब्रेट ली?
प्रीती झिंटा व ब्रेट ली जवळपास १५ वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०११ मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान तो म्हणाला होता, “किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना माझी प्रीती झिंटाशी खूप चांगली ओळख झाली. आणि हो, ती भारतातील माझ्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक आहे.”

प्रीती झिंटाने व्यक्त केला होता संताप
ब्रेट ली व प्रीती झिंटा यांच्या नात्याबद्दलच्या अफवा खूप पसरू लागल्यावर प्रीती संतापली होती. प्रीतीने एक निवेदन जाहीर करून ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’च्या सहकाऱ्यांबरोबर तिचे नाव जोडणाऱ्यांना सुनावलं होतं. “माझ्याच संघातील खेळाडूंबरोबर माझं नाव जोडण्याला मी आता कंटाळले आहे. स्पष्टच सांगायचं तर, मी सिंगल आहे आणि माझ्या संघातील किंवा कोणत्याही क्रिकेटपटूला डेट करत नाहीये. जेव्हा मी कोणाला डेट करेन, तेव्हा तुम्हा सर्वांना ते नक्कीच समजेल,” असं २०१० मध्ये प्रीती झिंटाने ‘एक्स’वर लिहिलं होतं.
ब्रेट ली आणि प्रीती झिंटाचे करिअर
प्रीती झिंटाने २०१६ मध्ये लॉस एंजिलीस येथे, तिचा बॉयफ्रेंड जीन गुडइनफशी एका खासगी सोहळ्यात हिंदू पद्धतीने लग्न केलं. २०२१ मध्ये सरोगसीद्वारे त्यांना जुळी मुलं झाली. प्रीती शेवटची दिग्दर्शक नीरज पाठक यांच्या ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटात दिसली होती. आता ती राजकुमार संतोषी यांच्या ‘बटवारा १९४७’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. यात सनी देओल मुख्य भूमिकेत असून आमिर खान या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
दुसरीकडे, ब्रेट लीने २० वर्षांच्या प्रदीर्घ करिअरनंतर २०१५ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. त्याने ऑस्ट्रेलियासाठी २२१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८० विकेट्स आणि ७६ कसोटी सामन्यांमध्ये ३१० विकेट्स घेतल्या आहेत.
