A cult Bollywood horror Film : हॉरर, रहस्यमय व गूढ कथानक असेल्या चित्रपटांचा वेगळा चाहतावर्ग असतो. अनेक प्रेक्षक हॉरर चित्रपटांचे रसिक असतात आणि खूप आवडीने ते या धाटणीचे चित्रपट पाहतात. म्हणूनच बॉलीवूडमधील अशा एका हॉरर चित्रपाबद्दल सांगणार आहोत, जो पाहण्यासाठी खरं तर खूप हिंमत लागते.
चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युटरनी स्वत:च या चित्रपटासाठी एक अट ठेवली होती की, जो हा चित्रपट एकट्यानं पाहू शकेल, त्याला १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. एवढंच काय, तर चित्रपट इतका भयानक आहे की, थिएटरबाहेर रुग्णवाहिका उभी असायची. रामसे ब्रदर्स यांच्या ‘पुराना मंदिर’, ‘वीराना’ यांसारख्या हॉरर चित्रपटांनी लोकांना जितकं घाबरवलं, तितकेच पैसेसुद्धा त्या चित्रपटांनी कमवून दिले. हे चित्रपट कमी बजेटमध्ये बनले असले तरी त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या सर्व चित्रपटांमधून सर्वाधिक लक्ष वेधणारा चित्रपट म्हणजे ‘दरवाजा’. जो १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला.
रामसे ब्रदर्सनी ‘दरवाजा’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्टशी संपर्क केला होता. दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना रामसेंची तिसरी पिढी दीपक रामसे आणि अमित रामसे यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. दीपक रामसे म्हणाले, “आज तुम्हाला हवा तसा मेकअप करता येतो. कारण- त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, पूर्वी असे खूप कमी मेकअप आर्टिस्ट होते. ज्यांना माहीत होतं की, मेकअप कसा बोलका वाटेल. कलाकारांना नेहमी सुंदर दिसायचं असतं; पण रामसेंबरोबर काम करताना तुम्हाला भयानक मेकअप करावा लागतो, ज्यामुळे लोक घाबरतील. भारतातही काही मेकअप आर्टिस्ट उपलब्ध होते. परंतु, आम्हाला लंडनहूनही मेकअप आर्टिस्ट बोलवावे लागले आणि त्यावेळी आमची क्रिस्टोफर टकरशी भेट झाली.”
चित्रपटाच्या लोकप्रियतेबद्दल दीपक रासमे पुढे म्हणाले, “तुम्ही याला पब्लिसिटी स्टंट म्हणून शकता. पण, डिस्ट्रिब्युटर्सनी जो कोणी थिएटरमध्ये जाऊन एकट्याने हा चित्रपट बघेल, त्याला १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणा केलेली. एवढंच काय तर थिएटरबाहेर रुग्णवाहिका उभी होती. चित्रपट तेवढा लोकप्रिय होता. पण कोणाचीही एकट्यानं हा चित्रपट बघण्याची हिंमत झाली नाही. ‘दरवाजा’मधील मेकअपमुळे अनेक हॉरर चित्रपटांना प्रेरणा मिळाली”.
दरम्यान, ‘दरवाजा’ या चित्रपटात अनील धवन, श्यामली, त्रीलोक कपूर, इम्तियाझ अली, साधना खोटे, दुलारी, अंजून महेंद्र, अलंकार जोसी, नझीर कश्मिरी, राकेश पांडेय हे कलाकार झळकले होते.
