Daayra Trailer Kshitee Jog Acting : करीना कपूरच्या ‘दायरा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. क्राईम, थ्रिलर आणि पोलिस तपासावर आधारित असलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. यामध्ये करीना व दाक्षिणात्य स्टार अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी स्क्रीन शेअर केली आहे. ‘दायरा’मध्ये आणखी एका कलाकाराने लक्ष वेधलं आहे, ती म्हणजे मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग.

‘दायरा’ सिनेमामध्ये क्षिती जोगने प्रभावी अभिनय साकारला असून ट्रेलरमध्ये त्याची झलक दिसून आली आहे. क्षितीने पीडित मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या सिनेमात क्षितीने पीडित व्यक्तीच्या घरच्यांचं दुःख मांडलं असून तिच्या अभिनयातून ते स्पष्टपणे दिसून येत आहे. ट्रेलरमध्ये क्षितीने मुलीवर अत्याचार झाल्यानंतर केलेला अभिनय पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो आहे. नेटकऱ्यांनी तिच्या जिवंत अभिनयाचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेंद्र जोशीनं साकारली पोलिसांची भूमिका

‘दायरा’ सिनेमात क्षिती जोगबरोबर मराठी अभिनेता जितेंद्र जोशीने भूमिका साकारल्याचे दिसून येत आहे. जितेंद्रने पोलिसांचे पात्र साकारले असून ट्रेलरमध्ये फक्त त्याची झलक दिसून आली. त्याच्या भूमिकेबाबत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जास्त लक्षात येईल.

करीना कपूर व पृथ्वीराज सुकुमारन यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केल्यानं प्रेक्षकांमध्ये ‘दायरा’ सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. करीना कपूर खानने डीसीपी अजूनी कोहली, तर पृथ्वीराज सुकुमारन डीसीपी रमन कुमारची भूमिका साकारत आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या सिनेमात एका भीषण बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांकडून होणारा तपास आणि कथित एन्काउंटर करून संपवलेलं प्रकरण यावर आधारित सिनेमाची गोष्ट असणार आहे.

जितेंद्र जोशीची ‘दायरा’मध्ये दिसली झलक

मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘दायरा’ हा सिनेमा येत्या १८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. याची कथा यश केसवानी, सीमा अगरवाल आणि मेघना गुलजार यांनी लिहिली आहे. जंगल पिक्चर्स आणि डॉ. जयंतीलाल गडा यांच्या पेन स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली आहे.