प्रियांका चोप्रासह अनेक अभिनेत्रींनी त्यांचे बीजांड गोठवले (Eggs Freeze) आहेत. आता सलमान खानची हिरोईन डेझी शाह हिनेही बीजांड गोठवल्याची माहिती दिली आहे. डेझी ४१ वर्षांची आहे. आई होण्यासाठी लग्नाची वाट पाहायची गरज नाही. तिला वाटेल तेव्हा आई होण्याचा निर्णय डेझी शाहने घेतला आहे.
“लग्नाबद्दल माझे काही वेगळे विचार नाहीत. मी सर्व काही देवावर सोडलं आहे. कुटुंब तयार करण्यासाठी लग्न करणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही. मी माझे बीजांड गोठवून घेतले आहेत, त्यामुळे मला हवं तेव्हा मी आई होऊ शकते. मी स्वतःच्या बाळाला जन्म देऊ शकते,” असं डेझी शाहने सांगितलं.
आयुष्यात हवं होतं ते सगळं मिळवलंय – डेझी शाह
डेझी शाहच्या मते सध्या तिच्या आयुष्यात खूप समाधानी आहे. आयुष्यात जे काही हवं होतं, ते मिळवलं आहे, असं डेझी सांगते. “मला आयुष्यात जे हवं होतं, ते सर्व मला मिळालं आहे. माझं हक्काचं घर असावं असं स्वप्न मी पाहिलं होतं आणि ते पूर्ण झालंय. मला माझ्या कुटुंबाला चांगलं आयुष्य द्यायचं होतं, तेही मी केलं. मला दोन कुत्री पाळायची होती. आधी एक होती, आता दोन आहेत. त्यामुळे मी खूप आनंदी आहे,” असं डेझीने ‘फिल्मज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
आताच्या नात्यांबद्दल काय म्हणाली डेझी शाह?
डेझी शाहने यापूर्वी तिच्या टॉक्सिक नात्यांबद्दलही भाष्य केलं होतं. तिच्या एका एक्स बॉयफ्रेंडने तिला पुरुष कलाकारांनाबरोबर काम करण्यापासून रोखलं होतं. “हल्ली तर रोज काही ना काही घडत असतं. कधी जोडपी वेगळी होतात, तर कधी हत्येच्या अशा विचित्र घटना घडतात, त्यामुळे खूप भीती वाटते,” असं डेझी म्हणाली. डेझीच्या मते ती स्वतः कमावते, त्यामुळे तिच्या वयाच्या व्यक्तीची सगळी जबाबदारी घेणं परवडणारं नाही. “हे फक्त पैशांबद्दल नाही, कारण मी स्वतःसाठी चांगले पैसे कमवते. पण मी एका मोठ्या माणसाची आई होऊ शकत नाही,” असं वक्तव्य तिने केलं.
जोडीदाराने तिच्या खर्चाची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा नाही, पण त्याचं एक ठराविक उत्पन्न असावं, असं तिने स्पष्ट केलं. ती म्हणाली, “सुरुवातीला गोडगोड बोलणं चांगलं वाटतं, पण नंतर नाही. मी कधीही प्रेम किंवा पैसा यापैकी एक निवडणार नाही, कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.”
डेझी शाहचे करिअर
डेझी शाह हिने सतीश कौशिक यांच्या २००३ सालच्या ‘तेरे नाम’ या रोमँटिक चित्रपटातील ‘लगन लगी’ या गाण्यात सलमान खानसोबत काम केले होते. त्यानंतर २०१४ मध्ये सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान याने दिग्दर्शित केलेल्या ‘जय हो’ या ॲक्शन चित्रपटात तिला मुख्य अभिनेत्री म्हणून संधी मिळाली. त्यानंतर २०१८ मध्ये रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘रेस ३’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात तिने पुन्हा एकदा सलमान खानबरोबर काम केलं. डेझी २०२४ मध्ये ‘रेड रूम’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. पुढे ती ‘द घोस्ट ऑफ गांधी’ ही सीरिज आणि सुजाद इक्बाल खान यांच्या ‘बिहू अटॅक’ या ॲक्शन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
प्रियांका चोप्रा, मोना सिंग, तनिषा मुखर्जी, रिचा चड्ढा, मंदिरा बेदी, फराह खान व एकता कपूर यांनीही आपले बीजांड गोठवले होते.

