डेझी शाह २००० च्या सुरुवातीपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. पण २०१४ मध्ये ‘जय हो’ चित्रपटात सलमान खानबरोबर मुख्य भूमिका साकारल्यानंतर तिला खरी ओळखली. विशेष म्हणजे, तिला सलमान खानच्या चित्रपटाची ऑफर पहिल्यांदाच मिळाली नव्हती. तिला सलमानच्या २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं, पण तिने ती ऑफर नाकारली. त्याचं कारण आणि नकार दिल्यानंतरची भीती याबद्दल डेझी शाहने सांगितलं.

चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पूर्णवेळ काम करण्यापूर्वी, डेझी कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची असिस्टंट म्हणून काम करत असे. ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना ती म्हणाली, “जेव्हा मी असिस्टंट कोरिओग्राफर होते, तेव्हा मी दररोज ५,००० रुपये कमवायचे. कधी कधी आम्ही महिन्यातून दहा दिवस शूटिंग करायचो, तर कधी पूर्ण ३० दिवस.”

२००१ पासून डेझी सिनेविश्वात सक्रिय आहे. डेझीने कन्नड चित्रपटसृष्टीत नशीब आजमावलं. तिने अनेक गाणीही केली. याच काळात सलमानने तिला ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती, जी तिने नाकारली होती.

गणेश आचार्यमुळे झाली सलमान खानशी भेट

डेझी म्हणाली, “मी ‘बॉडीगार्ड’साठी कधीच ऑडिशन दिली नव्हती. पण मी ‘जय हो’साठी ऑडिशन दिली होती. त्यावेळी मी आधीच एका दाक्षिणात्य चित्रपटात काम करत होते, तेव्हाच मुंबईत येऊन मी गणेशजींना भेटले होते. जेव्हा मला मोकळा वेळ मिळायचा, तेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करायचे. नंतर, त्यांनी मला सांगितलं की ते ‘दबंग’ चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग करणार आहेत. मग त्यांनी मला त्यांच्यासोबत यायला सांगितलं. मी गेले आणि तिथेच माझी सलमान सरांशी भेट झाली.”

डेझी शाहने बॉडीगार्डसाठी नकार का दिला?

त्या भेटीत डेझीने सलमानला सांगितलं की दाक्षिणात्य चित्रपटात काम करतेय. त्यावेळी सलमान ‘बॉडीगार्ड’साठी अभिनेत्री शोधत होते. त्यांनी तिला हेझल कीचने साकारलेली भूमिका ऑफर केली होती. “मला ती भूमिका करण्यात रस नव्हता. जर मी सलमान खानबरोबर काम करत असेल, तर मला त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला आवडेल. ती भूमिका महत्त्वाची होती, पण मी डान्सच्या बॅकग्राउंडमधून आले आहे. मला माझे डान्सचे कौशल्य दाखवणारी भूमिका करायची होती. हे त्या ऑफरला नकार देण्यामागचं मुख्य कारण होतं,” असं डेझी शाह म्हणाली.

नकार दिल्याने वाटलेली भीती

‘बॉलीवूड नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत डेझीने मान्य केलं की ही ऑफर नाकारणं सोपं नव्हतं. “मला वाटलं की आता माझी संधी हुकली. कारण त्यांना ‘नाही’ म्हणण्याची हिंमत कोणी करत नाही. पण कसंतरी मी ते धाडस केलं,” असं डेझी शाह म्हणाली.

सलमान खानने दीड वर्षांनंतर, डेझीशी पुन्हा संपर्क साधला. त्याने तिला ‘जय हो’साठी ऑडिशन देण्यास सांगितलं. त्यानंतर तिला ती भूमिका मिळाली. या चित्रपटाने १९० कोटी रुपयांची कमाई केली.