Daisy Shah on Palaash Muchhal Smriti Mandhana Cancelled Wedding : संगीतकार आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल आणि क्रिकेटर स्मृती मानधना यांचं लग्न ४ महिन्यांपूर्वी रद्द झालं. लग्न रद्द होण्याच्या कारणांमुळे पलाश चर्चेत आहे. पलाश सध्या एका चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय, त्यात बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाह महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. डेझीने पलाशबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे. त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं, हे माहित नसल्याने त्याला जज करणं चुकीचं आहे, असं डेझीला वाटतं.
‘मिस मालिनी’ला दिलेल्या मुलाखतीत डेझीने सांगितलं की, स्मृतीबरोबरचं लग्न मोडल्यानंतर पलाशला त्याच्या आगामी चित्रपटासाठी तिच्याशी संपर्क करण्यास संकोच वाटत होता. डेझीला काही अनोळखी लोकांचे फोन आहे, ते म्हणत होते की पलाश एक चित्रपट बनवतोय, त्यासाठी तिला कास्ट करण्याचा विचार करतोय. पलाशची बहीण पलक ही डेझीची जवळची मैत्रीण आहे, त्यामुळे डेझीला हे संशयास्पद वाटलं. कारण जर पलाशला संपर्क करायचा असेल तर तो थेट किंवा पलकच्या माध्यमातून करेल, अनोळखी लोक का बोलत आहेत?
पलाश डेझीला काय म्हणाला?
डेझी म्हणाली, “मी पलाशला मेसेज केला आणि विचारलं. तर तो म्हणाला, ‘मॅम, हे खरं आहे, पण सध्याच्या परिस्थितीमुळे मी कोणालाही वैयक्तिकरित्या फोन करत नाहीये, कारण त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो’.” त्यानंतर डेझी व पलाशने चित्रपटाच्या कथेवर चर्चा केली आणि डेझीने या सिनेमात काम करण्यास होकार दिला.
सत्य काय ते कोणालाच माहित नाही
पलाशसोबत काम करण्याबाबत शंका होती का? असे विचारल्यावर डेझी म्हणाली, “मी माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळे ठेवते. कोणाच्या वैयक्तिक आयुष्याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ नये. मुळात सत्य काय आहे, हे कोणालाच माहित नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. हे दोन कुटुंबांमधले प्रकरण आहे, आपण फक्त मीडियात ऐकलेल्या गोष्टींवरून जज करतोय. मी कोणाचीही बाजू घेत नाहीये, मी तटस्थ आहे. त्याने मला प्रोफेशनल कामासाठी संपर्क केला आहे, त्यामुळे मी त्याला जज करणारी कोण?”
पलाश व स्मृतीने एकत्र यावं, अशी इच्छा डेझीने व्यक्त केली. “मला आशा आहे की दोन्ही बाजूंच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील आणि ते पुन्हा एकत्र येतील, कारण त्यांची जोडी खूप छान दिसते.”
पलाश मुच्छल व स्मृती मानधना यांचं ब्रेकअप
पलाश आणि स्मृती गेल्या २३ नोव्हेंबरला लग्न करणार होते, पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर पलाशलाही मुंबईतील रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. या काळात पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याच्या चर्चा झाल्या होत्या. काही दिवसांनी पलाश व स्मृती दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून लग्न रद्द करून आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आणि सर्व फोटो डिलीट केले.
