Fatima Sana Shaikh Talk About Bulimia : मराठीसह हिंदी इंडस्ट्रीमधील काही कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही आजारांना सामोरे जावे लागते. त्याबद्दल ते नेहमीच आपले चाहते आणि प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवत असतात. स्वत:च्या आयुष्यातील काही कटू अनुभव ते शेअर करीत असतात. अशातच प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या एका आजाराबद्दल मोकळेपणानं सांगितलं आहे.

‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने तिला झालेल्या Bulimia या आजाराबद्दल सांगितलं आहे. फातिमा सना शेख सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘गुस्ताख इश्क’चं प्रमोशन करीत आहे. अशातच एका मुलाखतीत तिनं अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या तिच्या मानसिक विकाराबद्दल उघडपणे सांगितलं.

फातिमाला तिच्या पहिल्या ‘दंगल’ या चित्रपटासाठी वजन वाढवणं भाग पडलं होतं. त्यात तिनं एका कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिला तसा आहार घेण्याची गरज होती. मात्र, कालांतरानं तिची ही सवय पुढे चालूच राहिली. ‘दंगल’ सिनेमा करताना तिला २,५०० ते ३,००० कॅलरीजची गरज होती. मात्र, सिनेमा संपल्यानंतरही तिनं २,५०० ते ३,००० कॅलरीजयुक्त आहार घेणं सुरू ठेवलं.

Award Banner

रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये फातिमानं खुलासा केला की, तिनं दोन वर्षं Bulimia शी संघर्ष केला. त्याबद्दल ती म्हणाली, “‘दंगल’ करताना मला प्रत्येक दिवशी केवळ कॅलरीज खाणं आवश्यक होतं. अजूनही मी सतत अन्नाबद्दल विचार करते. मी कायमच भुकेली असते. चित्रपट संपल्यानंतरही मी त्याच पद्धतीनं खाणं सुरू ठेवलं; पण मी व्यायाम कमी करीत होती, ज्यामुळे मी तासन् तास फक्त खात बसायचे. माझा स्वत:च्या खाण्यावर कंट्रोलच नव्हता.”

फातिमा सना शेख इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, फातिमाला Bulimia या आजाराबद्दल तिचीच सहकलाकार संज्या मल्होत्रा हिनं सांगितलं. त्याबद्दल कळताच फातिमाला स्वत:ची खूप लाज वाटली. कारण- तिला समजलं की, ही बाब तिच्या मानसिक आरोग्यावर किती मोठा परिणाम करीत आहे. फातिमानं यावेळी सांगितलं की, या प्रवासात खूप कठीण प्रसंग आले; पण आता तिला तिच्या शरीराबद्दल माहिती मिळाली आहे आणि ती अधिक निरोगी व संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करीत आहे.