Darshan Jariwala Breaks Silence on Apara Mehta Allegations: अभिनेते दर्शन जरीवाला यांनी त्यांची पत्नी, अभिनेत्री अपरा मेहता यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. २००० च्या सुरुवातीला दर्शन यांनी “माझे तुझ्यावर प्रेम उरलेले नाही आणि तू मी पाहिलेली सर्वात कुरूप स्त्री आहेस” असं म्हणून घर सोडलं होतं, असं अपरा म्हणाल्या होत्या. हे दोघे गेल्या २३ वर्षांपासून वेगळे राहत आहेत, पण त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. अपरा मेहताच्या सर्व आरोपांवर दर्शन जरीवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सिद्धार्थ कन्ननशी बोलताना दर्शन म्हणाले, “वेळेनुसार घटनेच्या आठवणी बदलत जातात. मला नम्रपणे सांगायचंय, हा ‘फॉल्स मेमरी’चा म्हणजेच खोट्या आठवणींचा प्रकार आहे. जसं सांगितलं जातंय, तसं काहीही घडलेलं नाही. मी साध्या दिसणाऱ्या स्त्रीलाही कुरूप म्हणणारा माणूस नाही. मी माणसाचे बाह्य रूप न पाहता त्याचे मन पाहतो.”

२३ वर्षांनंतर आताच का? अपरा मेहतांचा सवाल

अपरा मेहता यांनी ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळावं, पण मी आयुष्यात पुढे गेलो आहे. तसेच इंटीरियर डिझायनर अनाहिता इटालियाबरोबर २०१० पासून आनंदाने राहत असल्याचं दर्शन जरीवालांनी सांगितलं. “२३ वर्षांनंतर आताच हा विषय का काढला जातोय, हे मला समजत नाही. सत्य कधीही बदलत नाही, सत्याचं कोणतंही व्हर्जन नसतं,” असं ते स्पष्टच बोलले.

आपल्या नात्याबद्दल बोलताना दर्शन म्हणाले, “काळानुरूप दोन व्यक्तींच्या विचारात फरक पडतो. माझं व्यवसायात नुकसान झालं, त्यामुळे परिस्थिती बदलली होती आणि आमच्या प्रायोरिटीज बदलल्या होत्या. पण तरीही, आमच्या मुलीला चांगलं बालपण मिळावं, सुखसोई मिळाव्या यावर आमचं एकमत होतं.”

अपरा मेहतांनी घटस्फोट देण्यास नकार दिला

    दर्शन जरीवाला यांनी सांगितलं की, त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, पण ऐनवेळी कोर्टात अपरा मेहता यांनी नकार दिल्यामुळे न्यायाधीशांनी अर्ज फेटाळला. वादानंतर दर्शन यांनी सांताक्रूझ येथील आपले घर पत्नी आणि मुलीला दिले व ते मित्रांकडे राहिले. सुरुवातीच्या खडतर काळानंतर, ऐश्वर्या रायबरोबरच्या जाहिरातीमुळे आणि २००७ मधील ‘गांधी, माय फादर’ या चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त भूमिकेमुळे त्यांच्या करिअरला वेग मिळाला आणि त्यांनी मागे वळून पाहिलं.

    दर्शन यांनी मुलीबद्दलही सांगितलं. ते सतत तिच्या संपर्कात असतात आणि तिचा खर्चही उचलतात. पत्नीने एकटीनेच मुलीचा सांभाळ केला हा दावा त्यांनी फेटाळून लावला.

    दरम्यान, काम करत असताना भेट झाल्यानंतर वयाच्या २०-२१ व्या वर्षी दर्शन जरीवाला व अपरा मेहता या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. नंतर कुटुंबीयांच्या संमतीने पुन्हा त्यांचं लग्न झालं. अपरा यांनी पतीच्या सीएच्या अभ्यासाचा खर्च केल्याचा दावा केला होता. तो फेटाळत दर्शन म्हणाले की, ते स्वतः स्टायपेंडमधून खर्च करत असत. मात्र, १९९० च्या दशकात व्यवसायात नुकसान झाल्यावर ३-४ वर्षे अपरा यांनी घर चालवण्यास नक्कीच मदत केली होती, असं त्यांनी सांगितलं.