Dayanand Shetty reveals Stars dogs come with nannie: अनेकदा बॉलीवूड कलाकारांच्या मानधनाबद्दल चर्चा होताना दिसते. बॉलीवूडच्या कलाकारांबरोबर त्यांची मोठी टीम असते, त्यामुळे खर्चात वाढ होते, असे अनेक निर्मात्यांनी विविध मुलाखतींमध्ये वक्तव्ये केली आहे. आता सीआयडी फेम दयानंद शेट्टीने याबद्दल वक्तव्य केले आहे.

“त्या श्वानांनी उत्तम…”

दयानंद शेट्टीने नुकतीच सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याला बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांच्या मोठ्या टीमबद्दल, त्यांच्याबरोबर असलेल्या लवाजम्याबद्दल तसेच सेटवरील त्यांच्या वागणुकीबद्दल विचारले. या प्रश्नाचे उत्तर देत तो म्हणाला, “ते त्याच पद्धतीने मोठे झालेले असतात. त्यांना वाटते की आपण स्टार आहोत, हे दाखवावं. त्या पद्धतीने ते वागतात.”

पुढे तो म्हणाला, “अनेक कलाकार त्यांचे श्वान त्यांच्याबरोबर आणतात. शूटिंगच्या ब्रेकमध्ये ते त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवतात. त्या श्वानांना सांभाळण्यासाठी त्यांच्या नॅनी असतात. त्या श्वानांनी उत्तम कपडे घातलेले असतात, गॉगल लावलेले असतात. त्यांचा मेकअप केलेला असतो.”

या सगळ्याकडे तू कशा पद्धतीने बघतोस? असे विचारल्यानंतर दयानंद म्हणाला, “त्यांचे श्वान खूप नशीबवान आहेत. तुम्ही जर याबद्दल खूप विचार केला तर त्याचा त्रास होऊ शकतो. नाहीतर तुम्हाला काही फरक पडणार नाही.”

चित्रपटनिर्माते संजय गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की काही कलाकारांच्या सहा व्हॅनिटी व्हॅन आहेत. तसेच, जास्त मागण्यांमुळे एका बॉलीवूड कलाकाराला एका दाक्षिणात्य प्रोजेक्टमधून काढल्याचेही त्यांनी सांगितले होते. याबरोबरच, अनुराग कश्यपने एका मुलाखतीत सांगितले होते की काही कलाकारांचे शेफ त्यांच्याबरोबर असतात. ज्यांची एका दिवसाची फी २ लाख असते. करण जोहरनेदेखील कलाकारांच्या वाढत्या मागण्यांबद्दल वक्तव्य केले होते.

दरम्यान, दयानंद शेट्टीला सीआयडी या मालिकेतील दया या भूमिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली.