Smita Patil Unseen Facts: बॉलीवूड गाजवणाऱ्या दिवंगत मराठमोळ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या अकाली निधनाने फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचा मेकअप ज्येष्ठ मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी केला होता. एका मुलाखतीत त्यांनी पार्थिवाचा मेकअप करण्याचा भावनिक अनुभव सांगितला. स्मिता पाटील यांची इच्छा होती की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना एका विवाहित स्त्रीप्रमाणे सजवून निरोप दिला जावा. अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत, रडत रडत दीपक सावंत यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा शेवटचा शृंगार कसा केला, याची माहिती आता समोर आली आहे.
अमिताभ बच्चन सारख्या बॉलीवूडमधील दिग्गजांबरोबर काम करणारे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या काही आठवणी सांगितल्या. रील मीट्स रियल या युट्यूब चॅनलशी बोलताना दीपक म्हणाले, “स्मिता पाटील अनेकदा म्हणायची की निधनानंतर तिच्यावर वधूच्या रुपात अंत्यसंस्कार करण्यात यावे. मी तिला रागवायचो की असं बोलू नये. ती तिच्या आईलाही असंच म्हणायची, त्याही तिच्यावर रागवायच्या.”
अमिताभ बच्चनसमोर मेकअप किट दिली अन्…
स्मिताच्या इच्छेप्रमाणे तिला तिच्या शेवटच्या प्रवासासाठी तयार करण्यात आलं होतं. तिचा शेवटचा मेकअप करण्यापूर्वी दीपक सावंत यांना अश्रू आवरत नव्हते. त्या शेवटच्या दिवसाची आठवण सांगताना दिपक म्हणाले, “स्मिताच्या मृत्यूनंतर तिची बहीण शिकागोहून येणार होती आणि तिला येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागले. या काळात स्मिताचे पार्थिव बर्फावर ठेवले होते. स्मिताच्या आईने मला मेकअप किट दिली. तिथे अमिताभ बच्चन आणि इतर लोक बसले होते. त्यांच्यासमोर मेकअप किट मला देत त्या म्हणाल्या ‘तिची इच्छा विवाहित स्त्री म्हणून मरण्याची होती, त्यामुळे ती तिला तयार कर.’ मी रडू लागलो आणि रडत रडत मी पार्थिवाचा मेकअप केला. तिच्या इच्छेप्रमाणे मी तिचा शेवटचा मेकअप केला होता.”

राज बब्बर व स्मिता पाटील यांचं नातं
स्मिता पाटील या आपल्या दमदार अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही त्या काळी प्रचंड चर्चेत राहिल्या होत्या. कारण त्या विवाहित राज बब्बर यांच्या प्रेमात पडल्या होत्या. राज यांना दोन अपत्ये होती. तरीही राज यांनी पत्नी नादिराला घटस्फोट न देता स्मिताशी लग्न केलं. या जोडप्याला मुलगा झाला. त्याचं नाव प्रतीक बब्बर, जो आता प्रतीक स्मिता पाटील या नावाने ओळखला जातो. प्रतीकच्या जन्मानंतर बाळंतपणातील गुंतागुंतीमुळे स्मिताची प्रकृती बिघडली आणि काही दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली. २८ नोव्हेंबर १९८६ रोजी प्रतीकचा जन्म झाला आणि १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिताचं निधन झालं.
राज बब्बर यांनी सांगितलेली स्मिता पाटीलची आठवण
रेडिफ.कॉमला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत राज बब्बर यांनी स्मिताच्या शेवटच्या क्षणांची आठवण करून दिली होती. “घरापासून ते हॉस्पिटलपर्यंत, ती सतत माफी मागत होती. मी तिला म्हणायचो की सगळं ठीक होईल. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांनी मला सगळं सांगितलं. एका तासानंतर, डॉक्टर आले आणि मला सांगितलं की ती कोमात गेली आहे,” असं राज बब्बर म्हणाले होते.
“मी तिचा एक भाग होतो आणि ती माझा एक भाग होती. तुम्ही स्वतःला कितीही धाडसी म्हणत असाल तरी आयुष्यभर तुमच्या हृदयाचा आणि आत्म्याचा भाग असलेल्या व्यक्तीची आठवण येणं स्वाभाविक आहे. ती आणि तिच्या आठवणी माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या आयुष्याचा एक भाग राहतील,” असं राज बब्बर स्मिता पाटीलच्या आठवणीत बोलले होते.
