Dhurandhar 2 Censor Board Logic: चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रेक्षकांबरोबरच अनेक सेलिब्रिटींकडूनही या चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. अभिनेता दीपक तिजोरीनेने देखील या चित्रपटाचं कौतुक केलंय. मात्र, त्याचबरोबर त्याने सेन्सॉर बोर्डाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चित्रपटात वापरलेल्या अपशब्दांना ज्या प्रकारे ‘अर्धवट म्यूट’ करण्यात आलंय, त्यामागे काय लॉजिक आहे, असा प्रश्न विचारत त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
गुरुवारी दीपकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. त्यावर ‘धुरंधर पार्ट २: द रिव्हेंज’ असं लिहिलं होतं. त्यावर एक छोटे रेड हार्ट होते. “कदाचित मला हे समजत नाहीये, हे मी मान्य करायला हवं. सेन्सॉर बोर्डाकडे (CBFC) किंवा त्यांच्या सदस्यांकडे जी समज आहे, ती कदाचित माझ्यात नसावी. कारण मला हे खरंच समजत नाहीये की, काही शिव्या अर्धवट म्यूट का केल्या आहेत आणि अर्ध्या ऐकू का येतात. काही ठिकाणी अपशब्द ऐकू येतात आणि काही ठिकाणी ते पूर्णपणे म्यूट केले जातात, यामागे नेमकं काय लॉजिक आहे?” असं त्याने विचारलं.
अपशब्द म्यूट का आणि कोणासाठी करतोय? दीपक तिजोरीचा सवाल
पुढे तो म्हणाला, “जेव्हा एखादा चित्रपट आधीच ’18+’ (A Certified) असतो, त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की हा चित्रपट फक्त प्रौढांसाठी आहे, तर मग आपण इथे अपशब्द म्यूट करून नक्की कोणासाठी हा प्रकार करतोय? आणि कशापासून कोणाला वाचवतोय… एखाद्या अर्धवट उच्चारलेल्या शब्दापासून? आणि त्यानंतर एक गोष्ट मला खरोखरच कळत नाही, ती म्हणजे तोच चित्रपट एक-दोन महिन्यांत ओटीटीवर प्रदर्शित होतो. कोणत्याही ‘म्यूट’शिवाय… कोणत्याही बदलाशिवाय… जसा तो बनवला होता तसाच! आणि तिथे मुलं तो चित्रपट बघतात, घरी… कुटुंबाबरोबर बसून, त्या व्हर्जनमध्ये सगळं स्पष्टपणे ऐकू येतं.”
शिव्या अर्धवट म्यूट करणं किती शहाणपणाचं?
शेवटी दीपक तिजोरी म्हणाला, “मी तर फक्त हेच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर प्रौढांसाठी असलेल्या थिएटर्समध्ये एखादी गोष्ट ‘अर्धवट म्यूट’ करणं कितपत शहाणपणाचं आहे, जेव्हा तीच गोष्ट काही काळानंतर घरी पूर्ण आवाजात चालते? कदाचित यामागे असं काही कारण असेल जे मला समजत नसेल. किंवा कदाचित, आपण चुकीच्या गोष्टींचा गरजेपेक्षा जास्त विचार करत आहोत. मी फक्त सिनेमाचं आणि सीबीएफसीचं लॉजिक समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.”
